Home गडचिरोली अतिशय कष्टाने निर्मित पुस्तकांचे विमोचन माझ्या हातून झाले हे माझे भाग्यच :...

अतिशय कष्टाने निर्मित पुस्तकांचे विमोचन माझ्या हातून झाले हे माझे भाग्यच : अरविंद सावकार पोरेड्डीवार

65

– चित्रलिपी व लेखसंग्रह या दोन पुस्तकांचे थाटात प्रकाशन

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : संध्या शेषराव येलेकर यांच्या रांगोळी रंग, रेषा, चित्र सौंदर्य या कुंचल्याच्या स्ट्रोकातून निर्मित कलाकृती आणि या कलाकृतीवर प्रा. विनोद नवघडे यांच्या कविता आणि चारोळ्या यांच्या संतुलित मिश्रणातून तयार झालेली चित्रलिपी तसेच संमिश्र हा आस्वादक लेखसंग्रह या दोन प्रतिष्ठित आणि अतिशय मेहनतीने तयार केलेल्या पुस्तकांचे विमोचन माझ्या हातून झाले हे मी माझं परम भाग्य समजतो, असे भावनिक उद्गार ज्येष्ठ सहकार नेते तथा सर्वोदय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अरविंद सावकार पोरेड्डीवार यांनी गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत आयोजित सदर पुस्तकांच्या प्रकाशन सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून काढले.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून दै. देशोन्नतीचे जिल्हा प्रतिनिधी प्रा. अनिल धामोडे होते तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे अधिव्याख्याता प्रा. पुनीत मातकर, गोविंदराव मुनघाटे महाविद्यालय कुरखेडा येथील प्राध्यापक व मराठी विभाग प्रमुख डॉ. नरेंद्र आरेकर होते.

अरविंद सावकार पोरेड्डीवार पुढे म्हणाले, संध्या येलेकर यांना या पुस्तकांच्या निर्मितीसाठी अतिशय कष्ट घ्यावे लागलेत. ही दोन्ही पुस्तके समाज व्यवस्थेच्या उपभोगासाठी नक्कीच आहे असे मी मानतो. त्याहीपेक्षा आपण आपल्या जीवनात संस्कृती संवर्धनासाठी आणि ज्या कलाकारांसाठी जे काही चांगलं करायला पाहिजे त्यासाठी अतिशय चांगलं काम प्रा. संध्या येलेकर आणि प्रा. विनोद नवघडे यांनी केले आहे. या सभागृहातील अप्रतिम अशा प्रकाशन सोहळ्यासाठी जमलेला हा मेळा अतिशय सुसंस्कृत, साहित्य, कला आणि कवी मनाची जाण असणारा आहे. प्रत्येकाने हे अतिशय सुंदर देखणं पुस्तक आपल्या जीवनात जतन करून ठेवावे, असे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. अनिल धामोडे म्हणाले, संध्या येलेकर यांची लेखनाची सुरुवात दै. देशोन्नतीच्या मनस्विनी या सदरातून झाली. वेगवेगळ्या विषयावर लेखन करीत असतानाच त्यांनी काढलेल्या रांगोळ्या, पेंटिंग ह्या देशोन्नतीतून प्रकाशित झाल्यात आणि त्याला लोकांमधून भरभरून प्रतिसाद मिळाला. आज त्यांनी उत्तम लेखिका, निवेदिका, संपादिका, वक्ता म्हणून आपला ठसा उमटविला आहे. सोबत त्यांच्यातील क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रातील गुणामुळे अष्टपैलू व्यक्तिमत्व हा शब्द सुद्धा त्यांच्यापुढे फिका वाटतो. या दोन्ही पुस्तक निर्मितीमध्ये मनस्विनीचा मोठा वाटा असल्याचे संध्याताई नेहमी सांगतात याबद्दल संध्याताईचा आम्हाला मनस्वी अभिमान वाटतो, असे ते म्हणाले. ही दोन्ही पुस्तके देशोन्नतीच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचवण्याचे काम करण्याचे आश्वासनही त्यांनी याप्रसंगी उपस्थितितांना दिलेत.

कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आणि पुस्तकावरील भाष्यकार प्राध्यापक डॉ. नरेंद्र आरेकर यांनी ही दोन्ही पुस्तके वाचकांना नवीन दृष्टिकोन देणारे आहे, असे ते म्हणाले. चित्रलिपी हे वेगळ्या थाटनितील पुस्तक असून चित्रावर किंवा कलाकृतीवर आधारित कविता आणि त्यातून निर्मित चित्रलिपी हा अनोखा असा प्रयोग असल्याचे त्यांनी म्हटले आहे. संमिश्र या पुस्तकातील बहुतेक लेख हे उत्तम ललित गद्य आहे. पण यातच संध्याताईंनी अडकून न पडता त्यांनी सामाजिक चळवळी, स्त्रियांचे प्रश्न, आदिवासी मुली आणि त्यांच्या प्रतिभा यावर अतिशय अभ्यासपूर्वक लेखन केले आहे. तर लग्न समारंभ आणि वऱ्हाड्यांची सहनशक्ती यावरील लेख सर्वांच्या डोळ्यात जळजळीत अंजन घालणारा आहे. संमिश्रमधील सर्व लेख, ललित, मी वाचलेले पुस्तके, सांस्कृतिक, शिक्षण अशी विभागणी केली असून दिशादर्शक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

दुसरे अतिथी प्रा. पुनीत मातकर यांनी चित्रलिपी या पुस्तकावर भाष्य करताना म्हणाले की, कलावंत आणि कवी हे सर्जनाचे साधक जेव्हा एकत्र येतात तेव्हा चित्रलिपी सारखी सुंदर कलाकृती आकारास येते. या चित्रलिपीमधील निसर्ग, नाती, माती, गाव, ईश्वर आणि मानवी जीवन व्यवहारातील भाव, रंग आदी कुंचल्यात उतरवून नंतर त्यातील अर्थछटा उलगडणारी अल्पाक्षरी शब्दावली फारच लोभस असून एका चित्रकाराला आणि एका कवीला उलगडलेलं हे नक्षीदार पिंपळाचे पान असल्याचे ते म्हणाले.

यावेळी ज्येष्ठ साहित्यिक प्रा. प्रमोद मुनघाटे यांची या दोन्ही पुस्तकावरील फेसबुक प्रतिक्रिया प्राचार्य स्मिताताई मुनघाटे यांनी उपस्थितांसमोर वाचून दाखविली. चित्रलिपी या पुस्तकाला माझी संचालक तथा वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. व्हि. जे. शिवणकर यांची प्रस्तावना लाभली असून प्रा. पुनीत मातकर यांचा ब्लर्ब लाभला आहे. तर समिश्र या पुस्तकाला नवरंग साहित्य संस्कृती व कला मंडळ नवी मुंबईचे उपाध्यक्ष अनिल मुनघाटे यांची प्रस्तावना लाभली आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. विनोद नवघडे यांनी तर संचालन अरुणा गोहने यांनी केले. उपस्थित उपस्थितांचे आभार संध्या येलेकर यांनी मानले. कार्यक्रमाला दंडकारण्य शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. राजूभाऊ मुनघाटे, श्री शिवाजी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अनिल पाटील म्हशाखेत्री, सचिव गोविंदराव बानबले, ज्येष्ठ सदस्य दादाजी चापले, शरद ब्राह्मणवाडे, शालिग्राम विधाते, ज्येष्ठ पत्रकार व सामाजिक नेते रोहिदास राऊत, ज्येष्ठ नाटककार चुडाराम बल्लारपुरे, डॉ. सुरेश लडके, दादाजी चूधरी, पांडुरंग घोटेकर, प्रा. गौतम डांगे, कवी गजानन मादसवार, सुप्रसिद्ध लेखक व कथाकार प्रमोद बोरसरे यांच्यासह साहित्य, कला, काव्य क्षेत्रातील मान्यवर तसेच मनस्विनीचे कोअर समिती सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शेषराव येलेकर, राजेश गोहणे, सतीश पवार, महेश बोरेवार, नितीन चेंबूलवार, वसंत विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुचिता कामडी, घनश्याम जक्कुलवार यांनी विशेष मेहनत घेतली.

error: Content is protected !!