Home गडचिरोली राष्ट्रीय महामार्ग 353 सी च्या दयनीय अवस्थेविरोधात नागरिकांचे अनोखे आंदोलन

राष्ट्रीय महामार्ग 353 सी च्या दयनीय अवस्थेविरोधात नागरिकांचे अनोखे आंदोलन

64

– रस्त्यावरील खड्ड्यात केले वृक्षारोपण व धान पिकाची रोवणी

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : राष्ट्रीय महामार्ग 353 सी च्या अत्यंत खराब अवस्थेमुळे त्रस्त झालेल्या जनतेने आज सकाळी 10 वाजता जिमलगट्टा फाटा येथे प्रशासनाचा निषेध करत अनोखे आंदोलन केले. रस्त्यावरील मोठमोठे खड्डे बुजविण्यास प्रशासनाला आलेले अपयश दाखवून देण्यासाठी संतप्त नागरिकांनी या खड्ड्यांमध्ये चक्क धानाचे रोपटे रोवले आणि वृक्षारोपण केले.

या आंदोलनाचे नेतृत्व सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी केले. गेल्या अनेक महिन्यांपासून या महामार्गाची दुरवस्था झाली असून वाहनचालक आणि स्थानिक रहिवाशांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. खराब रस्त्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. तसेच वाहतुकीचा वेग मंदावल्याने वेळ आणि इंधनाचा अपव्यय होत आहे. या त्रासाला कंटाळून सदर समस्या तातडीने सोडविण्यासाठी आणि शासन व प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी आज आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य सालाया कंबलवार, सामाजिक कार्यकर्ता राजू मामीडवार, यशवंत डोंगरे, स्नेहदीप आत्राम, शंकर रंगूवार, मरपल्लीचे सरपंच अरुण वेलादी, शंकर नैताम अर्कपल्ली, डॉ. साईश उपग्नलावार, नंदेश्वर मेश्राम, शैलेश कोडापे, महेश बोरकुट व कोन्जेडच्या माजी सरपंच ज्योती मडावी व परिसरातील नागरिक सहभागी होते.

या आंदोलनातून प्रमुख दोन मागण्या शासनाकडे करण्यात आल्या आहेत. यामध्ये येत्या 10 दिवसात खड्डे बुजविण्यात यावे, रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेले खड्डे त्वरित जीएसबी (Granular Sub-base) टाकून भरण्यात यावेत, कामास गती द्यावे, रखडलेल्या महामार्गाचे बांधकाम त्वरित पूर्ण करण्यात यावे आदी मागणी करण्यात आल्या. प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा निषेध करत नागरिकांनी ‘निषेध निषेध निषेध’ अशा घोषणा देत आपला संताप व्यक्त केला. या आंदोलनामुळे प्रशासनाचे लक्ष या गंभीर समस्येकडे वेधले जाण्याची आशा व्यक्त केली जात आहे. सदर मागणी पूर्ण करावी अन्यथा, भविष्यात अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही आंदोलकांनी दिला आहे.

error: Content is protected !!