Home गडचिरोली गडचिरोली पोलीस दलातील 7 पोलीस अधिकारी व अंमलदार यांना मा. राष्ट्रपती यांचे...

गडचिरोली पोलीस दलातील 7 पोलीस अधिकारी व अंमलदार यांना मा. राष्ट्रपती यांचे ‘पोलीस शौर्य पदक’ जाहिर

73

– हेमलकसा – कारमपल्ली रस्त्यावरील चकमकीदरम्यान जवानांनी बजावली होती उत्कृष्ट कामगिरी

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, 14 ऑगस्ट : देशभरामध्ये पोलीस दलात किंवा इतर सशस्त्र दलात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या पोलीस अधिकारी व अंमलदारांना स्वातंत्र्य दिनानिमित्त शासनाकडून सन्मानित केले जात असते. यावर्षी सुद्धा आज, 14 ऑगस्ट 2025 रोजी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंधेला मा. महामहीम राष्ट्रपती यांच्यातर्फे संपूर्ण महाराष्ट्र राज्यात एकुण 7 अधिकारी व अंमलदार यांना पोलीस शौर्य पदक जाहिर झाले असून, हे सर्व अधिकारी व अंमलदार गडचिरोली पोलीस दलातील आहेत. गडचिरोली पोलीस दलास सन 2025 मध्ये एकूण 7 पोलीस पोलीस शौर्य पदक प्राप्त झाले असून मागील पाच वर्षात एकूण 3 शौर्य चक्र, 210 पोलीस शौर्य पदक व 8 गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक प्राप्त झाले आहेत.

सन 2025 मध्ये गडचिरोली पोलीस दलातील सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी सुखदेव बंडगर, सफौ/1127 मनोहर कोतला महाका, चापोहवा/977 मनोहर लचमा पेंदाम, पोशि/3311 प्रकाश ईश्वर कन्नाके, पोशि/5415 अतुल सत्यनारायण येगोलपवार, पोशि/5916 हिदायत सदुल्ला खान, शहीद पोशि/5210 सुरेश लिंगाजी तेलामी (मरणोत्तर) यांना पोलीस शौर्य पदक मिळाले आहेत.

सन 2017 साली सी – 60 पथके पोस्टे कोठी येथून एमपीव्ही (ग्घ्ज्) वाहनांद्वारे भामरागडला परत येत असताना माओवाद्यांनी भूसुरुंग स्फोट घडवून आणून पोलीस पथकांवर हल्ला केला होता. माओवाद्यांच्या हा भ्याड हल्याचा पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी विवेकबुद्धी आणि मोठया धैर्याने प्रतिकार केला. त्यांनी जखमी व अडकलेल्या पोलीस जवानांचे तसेच स्वतःचे संरक्षण करत माओवाद्यांच्या प्रखर गोळीबाराला प्रत्युत्तर दिले होते. वरील सर्व अधिकारी व अंमलदार यांनी सदरच्या भूसुरुंग स्फोटादरम्यान केलेल्या कामगिरीची दखल घेऊन मा. राष्ट्रपती यांचे पोलीस शौर्य पदक जाहिर झाले आहे. यावेळी राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक प्राप्त पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांनी कौतुक केले असून त्यांच्या पुढील सेवेकरिता त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

error: Content is protected !!