– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला शोक
– यंत्रणांना तत्काळ मदत व उपचाराची कार्यवाही करण्याचे निर्देश
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली, ७ ऑगस्ट : गडचिरोली जिल्ह्यात आरमोरी – गडचिरोली महामार्गावरील काटली गावाजवळ पहाटे सव्वापाच वाजताच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात ४ युवकांचा मृत्यू झाला असून ही घटना अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायी असल्याचे मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. त्यांनी मृत युवकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली असून त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी असल्याचे स्पष्ट केले आहे.
गडचिरोली शहरापासून अवघ्या ७ किलोमीटर अंतरावर असलेल्या काटली गावाजवळ पहाटे फिरायला गेलेल्या ६ शालेय मुलांना एका भरधाव अज्ञात ट्रकने धडक दिली. या भीषण अपघातात ४ मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृतांमध्ये टिंकू नामदेव भोयर (१४ वर्ष), तन्मय बालाजी मानकर (१६ वर्ष), दुषण दुर्योधन मेश्राम (१४ वर्ष) आणि तुषार राजेंद्र मारभते (१४ वर्ष) यांचा समावेश आहे. हे सर्व काटली गावातील रहिवासी होते. या अपघातात टिंकू आणि तन्मय यांचा जागीच मृत्यू झाला, तर दुषणचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे गावात आणि परिसरात शोककळा पसरली आहे.
या अपघातात आणखी २ युवक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी हेलिकॉप्टरने हलविण्यात आले. सध्या त्या युवकांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.
राज्य सरकारकडून अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येक युवकाच्या कुटुंबीयांना ४ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार असून, जखमी झालेल्या युवकांच्या उपचाराचा सर्व खर्च राज्य सरकार उचलणार आहे, असेही त्यांनी जाहीर केले.
या दु:खद घटनेमुळे गडचिरोली जिल्ह्यात शोककळा पसरली असून, जिल्हा प्रशासनाकडून सर्व आवश्यक मदत तातडीने पुरवली जात आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या अपघाताची गंभीर दखल घेतली असून, संबंधित यंत्रणांना तत्काळ मदत व उपचाराची कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.





