Home गडचिरोली स्थानिक कंत्राटदारांनाच शासकीय बांधकामात प्राधान्य मिळावे

स्थानिक कंत्राटदारांनाच शासकीय बांधकामात प्राधान्य मिळावे

144
Oplus_16908288

– दक्षिण गडचिरोली दंडकारण्य कॉन्ट्रॅक्टर संघटनेची पत्रपरिषदेत मागणी

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कंत्राटदार बांधवांनी मोठ्या मेहनतीने बँकातून करोडो रुपयांचे कर्ज घेऊन जिल्ह्यातील अनेक ठिकाणी डांबर प्लांट टाकले आहेत. मोठा इन्फ्रॉस्ट्रॅक्चर तयार करून अनेक वाहने व मोठमोठ्या नवीन मशिनरी खरेदी केल्या. या माध्यमातून मागील अनेक वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्यातील तळागाळातील सर्वसामान्य गोरगरीब सुशिक्षित बेरोजगार यांना रोजगार देत आहेत. विविध कन्स्ट्रक्शन कंपनीच्या माध्यमातून ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध करून देण्यात येत आहेत. जिल्ह्यामध्ये उत्तम दर्जाचे रस्ते व इतर बांधकामे अविरत सुरू आहेत. परंतु सध्या गडचिरोली जिल्ह्यात एका कंपनीने नुकताच अनुभव नसतानाही गडचिरोली जिल्ह्यातील कॉन्ट्रॅक्टर यांच्या हातातील कामे स्वतः घेऊन ती कामे सुरू करण्याचा घाट सुरू केला आहे. यात स्थानिक कंत्राटदारांवर अन्याय होत असल्याने या जिल्ह्यातील शासकीय बांधकामे करताना स्थानिक कंत्राटदारांना प्राधान्य देण्यात यावे, अशी मागणी दक्षिण गडचिरोली दंडकारण्य कॉन्ट्रॅक्टर संघटनेने आज येथील सर्किट हाऊसमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत केली आहे.

संबंधित कॉन्ट्रॅक्टर कंपनीने जिल्ह्यात एका माजी अधीक्षक अभियंता व बांधकाम विभागातील काही कर्मचारी यांना हाताशी घेऊन नियमांना धाब्यावर बसवून स्थानिक कॉन्ट्रॅक्टर यांची कामे हिरावून घेण्याचा नियोजनबद्ध प्रयत्न सुरू केला आहे. जिल्ह्यात बोगस कामे करण्याचा प्रयत्न सुरू असून तो खपवून घेतल्या जाणार नाही. गडचिरोली जिल्ह्यात इतर कोणत्याही कंपनीचे बोगस कामे खपवून घेतले जाणार नाही, अशी भूमिका दक्षिण गडचिरोली कॉन्ट्रॅक्टर संघटनेने घेतली आहे. वेळ पडल्यास सर्व कंत्राटदार संघटनेच्या वतीने लवकरच रस्त्यावर सुद्धा उतरण्याची तयारी असून उपोषण व चक्काजाम सुद्धा करण्याची भूमिका सर्व कंत्राटदार संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी घेतली असल्याचे दक्षिण गडचिरोली दंडकारण्य कॉन्ट्रॅक्टर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे.

Oplus_16908288

सदर बोगस कंपनीच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना बदनाम करण्याचा कटकारस्थान सार्वजनिक बांधकाम विभागाने सुरू केलेला असून बांधकाम विभागाची हुकूमशाही व अन्याय आपण सहन करणार नाही, असा इशारा दक्षिण दंडकारण्य कंत्राटदार संघटनेचे सल्लागार डॉ  प्रणय खुणे यांनी पत्रपरिषदेत दिला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील सर्व कॉन्ट्रॅक्टर संघटनेच्या वतीने सदर व्यथा राज्य शासनाच्या समोर मांडल्या जाणार आहे व राज्याचे मुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस, राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे यांच्यासमोर सुद्धा सदर विषय दक्षिण दंडकारण्य कंत्राटदार संघटना भेट घेऊन मांडणार आहे. पुढील रणनीती तयार करण्यात येत असून बांधकाम विभागाने नुकताच पूर्वनियोजित केलेले एकूण पाच कंत्राट रद्द करावे, अशी मागणीही दक्षिण गडचिरोली दंडकारण्य कॉन्ट्रॅक्टर संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी पत्रपरिषदेत केली आहे.

या पत्रकार परिषदेला संघटनेचे अध्यक्ष साईनाथ बोंम्मावार, सचिव अरुण मुक्कावार, मार्गदर्शक डॉ. प्रणय खुणे, अरविंद कात्रटवार, नाना नाकाडे, सल्लागार नितीन वायलालवार, सहअध्यक्ष धनंजय पडिशाला, सहसचिव राकेश गुब्बावार, प्रवक्ता अश्विन मेड्डीवार, सहसचिव गौतम अधिकारी, राजू मेहता, अजय तुम्मावार, सुकलाल सरकार, मंगेश देशमुख, मनोज पवार, रमेश गंपावार, अजय गोरे व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!