Home गडचिरोली झिंगानूर भागातील समस्यांकडे ‘मानवाधिकार’ने वेधले लक्ष

झिंगानूर भागातील समस्यांकडे ‘मानवाधिकार’ने वेधले लक्ष

96

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : सिरोंचा तालुक्यातील झिंगानूर परिसर अजूनही विविध सोयीसुविधा आणि विकासापासून दूर आहे. आताच्या काळात आवश्यक झालेले मोबाईल नेटवर्कही नाही. त्यामुळे सर्वप्रथम बीएसएनएलचे मोबाईल टॅावर उभारण्यात यावे यासाठी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या वतीने जनआंदोलन उभारण्याचा इशारा राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ.प्रणय खुणे यांनी दिला.

सिरोंचा तालुका मुख्यालयापासून 60 किमी अंतरावर असलेला झिंगानूर हा आदिवासीबहुल अतिदुर्गम भाग विकासापासून कोसो दूर आहे. या गावात सन 1972 मध्ये शासकीय आदिवासी आश्रमशाळा उघडण्यात आली. मात्र या आदिवासी आश्रमशाळेत आजपर्यंत महाविद्यालय सुरू करण्यात आले नाही. झिंगानूर गावात कोणत्याही बँकेच्या सोयी उपलब्ध नाही. शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय नाही, मोबाईल फोन नेटवर्कची सुविधा नाही.

झिंगानूर ते रमेशगुडम हे गाव 8 किलोमीटर अंतर आहे. या गावाला लागुन बारमाही वाहणारी इंद्रावती नदी आहे. येथून उपसा जलसिंचन योजना सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. झिंगानूर ते सिरकोंडा हे अंतर 17 किमी आहे. सिरकोंडा ते रोमपल्ली 8 किलोमीटर, तर झिंगानूर ते रोमपल्ली अंतर 25 किलोमीटर आहे. त्यामुळे अनेक गावांना जोडणाऱ्या या मुख्य रस्त्यावरील नाल्यांवर अनेक नवीन पुलांची गरज आहे.

झिंगानूरपासून 5 किमी अंतरावर नैगुंडा नाला पुलाच्या प्रतीक्षेत आहे. झिंगानूर ते मंगीगुडम रस्ता काही वर्षांपूर्वीपासुन दुरुस्त झालेला नाही, गावात सुरळीत वीज पुरवठा करणे आवश्यक आहे.

झिंगानूर चेक नं. 2, झिंगानूर चेक नं.1, झिंगानूर माल, वडदेली या गावांमध्ये शेतातील पीक घेण्यासाठी पाण्याची सोय नाही. या आदिवासी भागातील तरुण पिढी उच्चशिक्षण घेऊन सुध्दा नोकरीपासून वंचित आहेत. हे युवक रोजगारासाठी तेलंगणात जात आहेत. राज्य सरकार शेतकऱ्यांना सिंचन विहिरी व बोअरवेल देत आहे, परंतु झिंगानूर भागात पाण्याची पातळी खूप खोल आहे. त्यामुळे उपसा सिंचन योजना देण्याची मागणी होत आहे. केंद्र व राज्य सरकारच्या अनेक योजनांपासून येथील शेतकरी वंचित आहेत. शासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या भागाकडे लक्ष देऊन नागरिकांच्या समस्या सोडवाव्यात, अशी मागणी केली जात आहे.

डॉ. प्रणय खुणे यांनी झिंगानूर येथे भेट देऊन समस्या जाणून घेतल्या. यावेळी सर्वप्रथम मोबाईल टॅावरची उभारणी करून बीएसएनएलची दूरसंचार सेवा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार, त्यासाठी प्रसंगी जनआंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला. यावेळी झिंगानूरच्या प्रथम नागरिक सरपंच निलीमा कारेजी मडावी, दक्षता समिती सदस्य तथा माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य कारेजी मडावी, माजी ग्रामपंचायत सदस्य रामचंद्र कुमरी, गावातील बचत गटाच्या महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!