– नागरी समस्या प्राधान्याने सोडवण्याचे दिले स्पष्ट निर्देश
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : गडचिरोली – चिमूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी गडचिरोली नगर परिषद कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत नगरपरिषद क्षेत्रातील विविध विकासकामे, नागरी समस्या आणि नागरिकांच्या मुलभूत गरजांवर सविस्तर चर्चा केली. या बैठकीत शहरातील दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या समस्यांबाबत माहिती घेत प्रशासनाला तत्काळ उपाययोजना करण्याचे स्पष्ट निर्देश खासदार डॉ. किरसान यांनी दिले.
बैठकीत गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी सूर्यकांत पिदूरकर, युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव विश्वजीत कोवासे, काँग्रेस शहराध्यक्ष व माजी नगरसेवक सतीश विधाते, माजी नगराध्यक्ष राजेश कात्रटवार, काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष समशेर पठाण, गडचिरोली तालुकाध्यक्ष वसंत राऊत, माजी नगरसेवक रमेश चौधरी, माजी नगरसेवक नंदू कायरकर, माजी नगरसेवक सुनील डोंगरा, माजी नगरसेवक गुलाब मडावी, प्रभाकर वासेकर, रजनीकांत मोटघरे, नितेश राठोड, रुपेश टिकले, सुरेश भांडेकर, संजय मेश्राम, रामकृष्ण ताजने, समीर ताजने, माजित सय्यद, गौरव येनप्रेड्डीवार, जावेद खान, कुणाल ताजने, लता मुरकुटे, कल्पनाताई नंदेश्वर, रिता गोवर्धन, यांच्यासह इतर पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीदरम्यान अनेक महत्त्वाचे मुद्दे उपस्थित करण्यात आले. अनेक वर्षांपासून अतिक्रमण करून वास्तव्यास असलेल्या गरीब व गरजू कुटुंबांना घरकुल योजनेचा लाभ मिळावा यासाठी त्यांना कायमस्वरूपी पट्टे वितरित करण्याची कार्यवाही त्वरित करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. शहरातील प्रत्येक नागरिकाला शुद्ध व सुरक्षित पिण्याचे पाणी मिळावे, यासाठी पाणीपुरवठा व्यवस्था बळकट करणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले.
तसेच शहरात स्वच्छता राखणे, नियमित नालीसफाई करणे, कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करणे आणि मंजूर विकासकामांमध्ये गुणवत्ता राखणे या बाबींवर भर देण्याचे निर्देश खासदार डॉ. किरसान यांनी दिले. शहराचे सौंदर्यीकरण आणि नागरी सुविधा उन्नत करण्यासाठी प्रशासनाने तत्परतेने कार्यवाही करावी, असे खा. किसान यांनी सांगितले.
या बैठकीत नागरिकांनी त्यांच्या अडचणी, सूचना आणि अपेक्षा मांडल्या. त्या सर्वांचा गांभीर्याने घेत, संबंधित अधिकाऱ्यांना वेळेत आणि प्रभावी निर्णय घेण्याचे निर्देश देण्यात आले. जनतेच्या समस्या प्राधान्याने सोडवण्याची जबाबदारी प्रशासनाची असून, सर्वांगीण विकासासाठी जनसहभागही तितकाच महत्त्वाचा असल्याचे डॉ. किरसान यांनी नमूद केले.







