विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार प्राप्त केल्याबद्दल नवरगाव ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामपंचायत अधिकारी खुशाल नेवारे यांचा सत्कार करण्यात आला.
ग्रामविकास विभाग व पंचायतराज विभागाअंतर्गत यशवंतराव चव्हाण पंचायतराज अभियान कार्यक्रम 27 मे रोजी मुंबई येथे पार पडला. या कार्यक्रमात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या पंचायतराज संस्था आणि गुणवंत अधिकारी व कर्मचारी पुरस्कार वितरण सोहळ्यात ग्रामपंचायत अधिकारी खुशाल नेवारे यांचा सपत्निक सत्कार करून सन्मानित करण्यात आले.
नागपूर विभागातील व गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा पंचायत समिती अंतर्गत सन 2022-23 मध्ये खुशाल नेवारे यांनी जिल्हा परिषद स्तरावर उत्कृष्ट काम केल्याबद्दल त्यांना सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत अधिकारी म्हणून गौरविण्यात आले. त्याबद्दल नवरगाव ग्रामपंचायतीच्या वतीने 31 मे रोजी नवरगाव ग्रामपंचायतीच्या सभागृहात शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला सरपंच रंजना शिडाम, उपसरपंच लक्ष्मी कोवा, ग्रामपंचायत सदस्य कपिल कोवा, बिसन हलामी, रोशनी कोकोडे, रुपाली कोरचा, रेशमी मडावी, साईनाथ गेडाम यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी व गावकरी उपस्थित होते.