चकमकीत विशेष अभियान पथकातील एक जवान शहीद

72

– माओवाद्यांच्या गडामध्ये घुसून गडचिरोली पोलिसांनी केला माओवाद्यांचा तळ उद्ध्वस्त

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली पोलीस दल माओवादाला मोठ्या हिमतीने व सातत्याने तोंड देत आहे. माओवादाविरुद्धची ही लढाई अविरतपणे चालू आहे. भामरागड तालुक्यातील मौजा दिरंगी व फुलनार गावांच्या जंगल परिसरात काही सशस्त्र माओवादी घातपात घडविण्याच्या उद्देशाने एकत्रित जमून तळ ठोकून असल्याच्या गोपनिय सुत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर गडचिरोली पोलीस दलाकडून माओवादविरोधी अभियानाची योजना आखण्यात आली होती.

यावरून दिनांक 10 फेब्रुवारी 2025 रोजी विशेष अभियान पथकाच्या 18 तुकड्या व सीआरपीएफ क्युएटी पथकाच्या 2 तुकड्या सदर जंगल परिसरात माओवादविरोधी अभियान राबविणेकामी रवाना करण्यात आल्या होत्या. मौजा दिरंगी-फुलनार जंगल परिसरात पोहचून विशेष अभियान पथकातील जवानांकडून शोधमोहिम सुरु करण्यात आली होती. त्या दरम्यान पोलीस पथक सुरक्षिततेची काळजी घेत पुढे जात असताना पोलीस पथक आल्याचा सुगावा लागल्याने माओवाद्यांनी जवानांच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार सुरु केला. त्यावेळी जवानांनी देखील मोठ्या हिंमतीने प्रत्युत्तरादाखल व स्वरंक्षणासाठी माओवाद्यांच्या दिशेने गोळीबार केला. पोलिसांचा वाढता दबाव पाहून माओवाद्यांनी घनदाट जंगलाचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला. मात्र घनदाट जंगलाचा फायदा घेत माओवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्यामध्ये गडचिरोली विशेष अभियान पथकातील पोशि/3836 महेश कवडू नागुलवार हे गोळी लागून जखमी झाले होते. त्यांना घटनास्थळावरुन हेलीकॉप्टरच्या मदतीने बाहेर काढून तातडीने सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे हलविण्यात आले होते. परंतू दुर्देैवाने या दरम्यान महेश कवडू नागुलवार यांना वीरगती प्राप्त झाली.

सदर परिसरात जवानांनी शोध अभियान राबविले असता, सदर ठिकाणावरुन अंदाजे 100 फुट लांबीची कॉर्टेक्स वायर, जिलेटीन कांडी 15 नग, डेटोनेटर 04 नग, लाल-काळ्या रंगाचा वायर बंडल 01 नग (अंदाजे 70 फुट), सोलार प्लेट 01 नग, वॉकीटॉकी 01 नग, वॉकीटॉकी चार्जर 01 नग, वॉकीटॉकी अॅडॅप्टर 01 नग, टॉर्च 02 नग, युएसबी केबल 01 नग, ताडपत्री 02 नग, जर्मन गंज 02 नग, स्टिल ताट 01 नग, स्टिल मग 02 नग, प्लॅस्टीक कॅन 02 नग, नक्षल डांगरी 01 नग, नक्षल पिट्टु 04 नग, नक्षल पुस्तके इत्यादी दैनंदिन वापरातील साहित्य जप्त करण्यात आले आहे.

गडचिरोली पोलीसांकडून सदर जंगल परिसरात माओवादविरोधी अभियान तीव्र करण्याचे संकेत देण्यात आले आहेत.