– गटशिक्षणाधिकारी सुधीर आखाडे याचे आवाहन
– धानोरा येथे शिक्षक सक्षमीकरण प्रशिक्षण
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : शिक्षकांनी समाजाचा शिक्षण प्रक्रियेत सहभाग करून घ्यावा. नवीन शैक्षणिक धोरणानुसार शिक्षकांना सक्षम करणे गरजेचे आहे. बदलत्या काळाच्या प्रवाहात शिक्षण पद्धतीत बदल झाला असल्याने त्यानुसार शिक्षकांनी सुद्धा स्वतःला अद्यावत ठेवावे. शैक्षणिक साहित्याचा अध्यापन प्रक्रियेत पुरेपूर वापर करावा. मूलभूत क्षमतांचे ज्ञान विद्यार्थ्यांना अवगत करण्यासाठी शिक्षकांनी सर्वतोपरी प्रयत्न करावा. पाहिजे तसा टप्पा अजूनही शिक्षण प्रक्रियेत आपल्याला गाठता आला नसल्याचे अपयश पुसून काढण्यासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊन शिक्षकांनी नव्या जोमाने विद्यार्थ्यांना घडवावे, असे आवाहन धानोरा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी सुधीर आखाडे यांनी केले.
धानोरा येथील गटसाधन केंद्रात इयत्ता ६ ते १२ वीला शिकविणाऱ्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक सक्षमीकरण प्रशिक्षकांचे पाच दिवसीय तालुकास्तरीय प्रशिक्षण सोमवार, १० फेब्रुवारीपासून सुरू झाले. यावेळी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. सदर प्रशिक्षण शुक्रवार,१४ फेब्रुवारी पर्यंत आयोजित केले आहे.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून तज्ञ मार्गदर्शक प्रशांत जीवतोडे, भुमेश्वर बुरमवार, कीर्ती फुंडे, जितेंद्र रायपुरे, विकेश बारशिंगे, आर. टी. मोहिते, लोमेश धुडसे, कैलास खोब्रागडे आदी मान्यवर उपस्थित होते. सदर प्रशिक्षणाला पहिल्या दिवशी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य बळीराम चौरे यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले.
या प्रशिक्षणात राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या अनुषंगाने शिक्षकांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा, समग्र प्रगती पत्रकाचा प्राथमिक उद्देश, शिक्षक मूल्यांकन ,स्वयं मूल्यांकन, बाह्य मुल्यांकन, सहाध्यायी मूल्यांकन, क्षमता आधारित अध्ययन व अध्यापन प्रक्रिया, क्षमता आधारित मूल्यांकन, शाळांचे मूल्यांकन करण्याच्या पायऱ्या, मूल्यांकन प्रक्रियेतील मूलभूत घटक, पायाभूत स्तर, पूर्वतयारी स्तर, पूर्व माध्यमिक स्तर, माध्यमिक स्तर, राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार ५+३+३+४ हा नवीन आकृतीबंध, निरंतर सुधारणात्मक प्रक्रिया, विद्यार्थ्यांना अध्ययनासाठी व सुधारण्यासाठी प्रयत्न करणे याबाबत प्रशिक्षण दिल्या जात आहे.
प्रशिक्षणात शिक्षक सुधीर शेंडे, प्रशांत साळवे, टी. ए. आस्कर, देवराव चौधरी, विराग रणदिवे, प्रशांत नागुलवार, अतुल बोरकर, के. एन. नागमोती, प्रशांत तोटावार, एम. जे. भांडेकर, पी. यु. बखर, आर. जे. साखरे, जी. जी. मारबोनवार, स्वाती गजभिये, शरद बावणे, स्नेहा हेमके, निवेदिता वटक, दुशिला उंदिरवाडे, वर्षा मस्के, सुनील नरोटे, पी.आर. डोंगरवार, बी.आर. पानघाटे, डी. आर. वैरागडे, एन. आर. मेश्राम यांच्यासह १२३ शिक्षकांचा सहभाग आहे.







