Home गडचिरोली मौल्यवान सागवानाला तस्करांची वाळवी

मौल्यवान सागवानाला तस्करांची वाळवी

140

– सिरोंचा तालुक्यातील वनतस्करी अनियंत्रित

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : जिल्ह्याचा दक्षिण टोक असलेल्या सिरोंचा तालुक्यात मौल्यवान सागवनाची नैसर्गिक देणगी लाभली आहे. मात्र या मौल्यवान सागवानाला तस्करांची वाळवी लागली असल्याने सिरोंचा तालुक्यातील सागवान तस्करी अनियंत्रीत झाली आहे. वनविभागाद्वारे तस्करांवर कारवाई केली जात असली तरी या तस्करीवर पूर्णत: आळा बसविण्यात वनविभागाला यश आलेले दिसून येत नाही. सागवान तस्करीत शेजारच्या राज्यातील तस्कर मोठ्या प्रमाणात सक्रिय असल्याने कठोर कारवाईची गरज आहे, अन्यथा येथील मौल्यवान सागवान येत्या काही वर्षात नष्ट होण्याची भीती व्यक्त होत आहे.

सिरोंचा तालुक्यात आढळून येणारे सागवान मौल्यवान म्हणून ओळखले जाते. जिल्ह्यातच नव्हे तर परराज्यासह देश-विदेशातूनही येथील सागवानाला मोठी मागणी आहे. याच लालसेपोटी तालुक्यात सागवान तस्कर सक्रिय झाले आहेत. वनविभागाद्वारे सागवान तस्करीच्या कारवाया दाखविल्या जात असल्या तरी संबंधित विभाग तस्करांच्या कायमस्वरुपी मुसक्या आवळण्यात मात्र अपयशी ठरत आहे. परिणामी या तालुक्यातील मौल्यवान सागवानसह इतर वृक्षांची कत्तल राजरोस सुरुच आहे. सागवान तस्करीत शेजारच्या राज्यातील तस्करांचाही मोठा हात आहे. सागवान तस्करीसह या भागात शिकार करणारी टोळी सक्रिय झाली आहे. त्यामुळे या तस्करांसह शिकार टोळीचे समुळ उच्चाटन करण्यासाठी वनविभागाद्वारे विशेष पथकाची नेमणूक करण्याची मागणी तालुक्यातील नागरिकांकडून होत आहे.

नदीमार्गे सागवन तस्करी जोमात
सिरोंचा तालुका तेलंगणा राज्य सीमेलगत आहे. तालुका सीमेतून गोदावरी, प्राणहिता व इंद्रावती या बारमाही वाहणाऱ्या नद्या आहेत. सागवान तस्कर गोदावरी या मुख्य नदीसह या नद्यांमार्गे तेलंगणा राज्यात सागवानांची तस्करी करीत आले आहेत. कमी कालावधीत अधिक मिळकत प्राप्त होत असल्याने तालुक्यात मोठ्या प्रमाणात सागवन तस्कर सक्रिय आहेत. तालुक्यातील मौल्यवान सागवानाची तेलंगणा राज्यात तस्करी करण्याचा प्रकार मागील अनेक वर्षापासून सुरु आहे.

वनविभागाचा नाकर्तेपणा कारणीभूत
सिरोंचा वनविभागांतर्गत येत असलेल्या आठही वनपरिक्षेत्र कार्यालयात वनतस्करी, वृक्षतोड, जंगलात वणवा लागून वनसंपदा नष्ट होण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात घडले आहे. वर्षभराचा आढावा घेतल्यास या भागात वन्यप्राण्यांच्या शिकारीच्या घटनाही उघडकीस आल्या आहेत. यास सर्वस्वी वनविभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांचा नाकर्तेपणा कारणीभूत ठरत आहे.

– संतोष ताटीकोंडावार, सामाजिक कार्यकर्ते

error: Content is protected !!