विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : ६८-गडचिरोली विधानसभा मतदारसंघात सोमवार, ११ ते बुधवार, १३ नोव्हेंबर या कालावधीत सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत पोलीस व होमगार्ड विभागाच्या कर्मचाऱ्यांचे टपाली मतदान शांतता व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. एकूण १ हजार ५९३ मतदारांपैकी १ हजार १८९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याने ७४.६४ टक्के मतदान झाले.
मतदानासाठी गडचिरोली येथील निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कार्यालयात एक मतदान सुविधा केंद्र तर तहसील कार्यालयात दोन मतदान सुविधा केंद्र स्थापन करण्यात आले होते. या मतदान केंद्रात गडचिरोली विधानसभा क्षेत्रात कार्यरत गडचिरोली जिल्ह्यातील तसेच बाहेर जिल्ह्यातील पोलीस व होमगार्ड विभागातील मतदारांनी मतदान केले. १ हजार ४४६ पोलीस कर्मचाऱ्यांपैकी १ हजार ६९ पोलीस कर्मचाऱ्यांनी मतदान केले.१४७ होमगार्ड कर्मचाऱ्यांपैकी १२० होमगार्ड कर्मचाऱ्यांनी मतदान केले.
विधानसभा निवडणुकीत पोलीस अधिकारी व कर्मचारी मतदानापासून वंचित राहू नये यासाठी टपाली मतदान केंद्राची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती.
निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी राहुलकुमार मीना यांच्या मार्गदर्शनाखाली टपाली मतपत्रिका शाखेचे पथक प्रमुख गडचिरोली नगर परिषदचे मुख्याधिकारी सूर्यकांत पिदूरकर यांच्या नियंत्रणात नेमलेल्या पथकांकडून पोलीस व होमगार्ड विभागाच्या कर्मचाऱ्यांचे टपाली मतदान पार पडले.





