Home गडचिरोली गडचिरोली विधानसभा मतदारसंघात १४७ मतदारांनी केले गृहमतदान

गडचिरोली विधानसभा मतदारसंघात १४७ मतदारांनी केले गृहमतदान

87

– पथके पोहोचली मतदारांच्या दारी ; ९३.६३ टक्के गाठले उद्दिष्ट

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून त्यापूर्वी गृहमतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. ६८-गडचिरोली (अ.ज.) विधानसभा मतदारसंघात १० व ११ नोव्हेंबर रोजी गृहमतदान प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी राहुलकुमार मीना यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. ८५ वर्षावरील ११७ व दिव्यांग ४० अशा एकूण १५७ गृह मतदारांपैकी १४७ मतदारांनी गृह मतदानाचा हक्क बजावल्याने ९३.६७ टक्के उद्दिष्ट गाठले.

दोन दिवस मिळून ८५ वर्षावरील ११७ मतदारांपैकी १०८ मतदारांनी मतदान केले. ४ मतदार मय्यत आहेत. ४ मतदार अनुपस्थित होते व एकाने गृह मतदान करण्यास नकार दिला. ४० दिव्यांग मतदारांपैकी ३९ मतदारांनी मतदान केले. एक मतदार मय्यत आहे.

गृह मतदानाची प्रक्रिया दोन दिवस चालली. गृह मतदानासाठी अर्ज केलेल्या १५७ मतदारांपैकी १४३ मतदारांनी पहिल्या दिवशी गृह मतदान केले तर दुसऱ्या दिवशी ४ मतदारांनी गृह मतदान केले. असे एकूण १४७ मतदारांनी दोन दिवस गृह मतदान केले. पहिल्या दिवशी ८५ वर्षावरील १०५ मतदारांनी तर दुसऱ्या दिवशी ३ मतदारांनी गृह मतदान केले. दिव्यांगापैकी ३८ मतदारांनी पहिल्या दिवशी तर एका मतदाराने दुसऱ्या दिवशी गृह मतदान केले.

गृह मतदानासाठी २१ पथकांची नियुक्ती करण्यात आली होती. प्रत्यक्ष १७ पथके गृह मतदानासाठी मतदारांच्या घरी जाऊन मतदान कक्ष तयार केले व मतदानाची प्रक्रिया पार पाडली. ४ पथके राखीव ठेवण्यात आली होती.गडचिरोली विधानसभा क्षेत्रात गडचिरोली, धानोरा व चामोर्शी या तालुक्यांचा समावेश आहे.

टपाली मतपत्रिका शाखेचे पथक प्रमुख गडचिरोली नगर परिषदचे मुख्याधिकारी सूर्यकांत पिदूरकर यांनी आपल्या नियंत्रणात नेमलेल्या पथकांकडून उत्कृष्ट काम करून घेतले. महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक मतदान करून राज्यात आदर्श निर्माण करण्याचे आवाहन जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी संजय दैने यांनी सर्वांना केले आहे.

error: Content is protected !!