– विविध आदिवासी संघटनांच्या बैठकीत केले नियोजन
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : येत्या ९ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी मूलनिवासी दिवस गडचिरोली येथे भव्य स्वरूपात साजरा करण्यात येणार आहे. या संदर्भात गडचिरोली येथील आदिवासी जंगल कामगार सहकारी संस्थेच्या दलितमित्र लहुजी मडावी सभागृहात आयोजित विविध आदिवासी संघटनांच्या बैठकीत कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले.
सभेच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे विदर्भ कार्याध्यक्ष घनश्याम मडावी होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आदिवासी एम्प्लाईज फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष माधवराव गावळ, सचिव सदानंद ताराम, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल गेडाम, परिषदेच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्षा वर्षा शेडमाके, बाबुराव मडावी स्मारक समितीचे अध्यक्ष गुलाब मडावी, नारीशक्ती संघटनेच्या जिल्हाध्यक्ष जयश्री येरमे, स्व. नारायणसिंह उईके संघर्ष समितीचे अध्यक्ष वनिश्याम येरमे, उमेश उईके, परिषदेचे युवा जिल्हाध्यक्ष विनोद मडावी, अमरसिंग गेडाम, डॉ. हेमराज मसराम, आनंदराव कंगाले, सरादू चिराम, मुकूंदा सिडाम आदी मान्यवर उपस्थित होते.
या बैठकीत ९ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिनानिमित्ताने विविध कार्यक्रम घेण्याचे नियोजन करण्यात आले. यामध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, सेवानिवृत्तांचा सत्कार, विविध क्षेत्रात प्राविण्यप्राप्त केलेल्यांचा सत्कार, प्रमुख महत्त्वपूर्ण वक्त्यांचे मार्गदर्शन, समाजाविषयी प्रबोधन करण्यात येणार आहे. सायंकाळच्या सत्रात आदिवासी संस्कृतीचे जतन करत सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्याचे ठरविण्यात आले. या बैठकीत ९ ऑगस्ट रोजी सकाळपासून तर रात्री १२ वाजेपर्यंत कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. कार्यक्रम सुनियोजित व शिस्तबद्ध रितीने पार पडण्याच्या दृष्टीने नियोजन झाले पाहिजे असे ठरविण्यात आले. या नियोजनात महिलांचा सक्रीय सहभाग महत्वाचा राहील, असे सांगण्यात आले. बैठकीत पुरुषांपेक्षा महिलांची संख्या लक्षणिय होती. या संदर्भात येत्या काही दिवसात पुन्हा बैठक आयोजित केली जाणार आहे. यावेळी महिलांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले. बैठकीला जिल्ह्यातील आदिवासींच्या विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.







