विद्यार्थी व सर्वसामान्य नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी संप मागे घ्यावे : आ. डॉ. देवराव होळी यांची एसटी संपकऱ्यांंना विनंती

79

– एसटी संपकऱ्यांंच्या मागण्या यापुढेही आपण विधिमंडळाच्या माध्यमातून सोडविण्याचा प्रयत्न करणार

गडचिरोली : मागील अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या एस. टी. कर्मचाऱ्यांच्या संपामुळे सर्वसामान्य नागरिकांची, विद्यार्थ्यांची प्रचंड गैरसोय होत असून यामुळे खाजगी प्रवासी वाहन धारकांकडून मोठ्या प्रमाणात लूट होत आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून विद्यार्थी व नागरिक यांना होणारा त्रास टाळण्यासाठी संप मागे घ्यावा, असे आवाहन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवराव होळी यांनी गडचिरोली येथील एसटीच्या संपकऱ्यांच्या मंडपात भेट देऊन केली.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा महामंत्री गोविंदजी सारडा, पंचायत समितीचे उपसभापती विलास दशमुखे, पंचायत समिती सदस्य शंकर नैताम यांचेसह बस आगाराचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. मागील अनेक दिवसांपासून एस. टी. चा संप सुरू आहे. गडचिरोली जिल्ह्यात त्याला मोठा त्याला प्रतिसाद आहे. जिल्ह्यातील बस स्थानक बंद असल्याने गडचिरोली जिल्ह्यातीलच नव्हे संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील जनतेला त्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. अनेक खाजगी वाहन धारक सर्वसामान्य लोकांकडून मोठ्या प्रमाणात लूट करीत आहेत आणि आता विद्यार्थ्यांच्या शाळा सुरू झाल्याने त्याचा मोठा फटका विद्यार्थ्यांना बसणार असून परीक्षार्थींनाही फटका बसणार आहे. त्यामुळे आता संप मागे घ्यावा व सर्वसामान्य जनतेला दिलासा द्यावा, अशी विनंती आमदार डॉ. देवराव होळी यांनी या मंडपातील संपकऱ्याना भेट देऊन केली.