जहाल नक्षली तेलतुंबडेची अभेद्य अत्याधुनिक सुरक्षा तोडण्यात गडचिरोली पोलिसांना यश – पालकमंत्री एकनाथ शिंदे

207

– गडचिरोली पोलीस विभागाला जिल्हा नियोजन निधीतून ५१ लाखांचे बक्षिस

गडचिरोली : ग्यारापत्ती – कोटगुलच्या जंगलात शनिवारी झालेल्या नक्षली चकमकीत 26 नक्षलवादी मारले गेले. यावेळी त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आलेला अत्याधुनिक शस्त्र पुरवठा मी पाहिला असून अतिशय मोठ्या प्रमाणात नक्षली तेलतुंबडे याची सुरक्षा व्यवस्था असून सुद्धा त्याला मारण्यात गडचिरोली पोलिसांना यश आले हे कौतुकास्पद आहे. या कारवाईमुळे महाराष्ट्रासह इतर नक्षलग्रस्त राज्यांमधील नक्षलींनी धडा शिकवण्यात आपल्या राज्याला यश आल्याचे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथील पोलीस मुख्यालयात सोमवारी सायंकाळी आयोजित पत्रपरिषदेत सांगितले. गडचिरोली पोलीस दलाने केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हा नियोजन मधील निधीतून 51 लाखांचे बक्षीस देण्याची घोषणाही आज गडचिरोली येथे केली. पोलिसांचे मनोबल वाढाव्यात वाढावे व त्यांना आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून या निधीचा निश्चितच त्यांना फायदा होईल, असे ते यावेळी म्हणाले. पोलीस-नक्षल चकमकीत सी-60 जवानांकडून 26 नक्षल मारले गेले. त्याबद्दल त्यांनी पोलीस अधिकारी व जवानांचे अभिनंदन केले. पोलिसांचे मनोबल वाढविण्यासाठी ज्या अडचणी असतील ते मा. मुख्यमंत्री व गृहमंत्री यांच्याशी चर्चा करुन सोडविले जाईल. या कारवाईमुळे नक्षल चळवळीला जबरदस्त हादरा बसलेला आहे. तसेच या कारवाईमुळे देशभरात जे नक्षली संघटना आहेत त्यांनाही जबर हादरा बसला असल्याचे ते यावेळी म्हणाले. नक्षलविरोधी कामगिरी बजावणाऱ्या शहिदांच्या कुटुंबियांच्या पाठीशी राज्य सरकार भक्कमपणे उभे राहणार असून त्यांच्या मागण्यांची शासन दखल घेणार असल्याची ग्वाही पालकमंत्र्यांनी यावेळी दिली. यावेळी पोलिसांच्या मागण्या मी सोबत घेऊन जात आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून येत्या काळात जलद गतीने त्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ते यावेळी म्हणाले. यावेळी पालकमंत्री शिंंदे यांनी उपस्थित पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील, पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, यांच्यासह सर्व पोलीस अधिकाऱ्यांचे कौतुक केले व अभिनंदनही केले.