ग्यारापत्ती – कोटगुलच्या चकमकीत ठार झालेल्यांमध्ये १४ जहाल नक्षलींचा सहभाग

216

– नक्षली कारवाईचा तीन राज्यांना होणार फायदा

– नक्षल्यांचे मृतदेह कुटुंबीयांना स्वाधीन करण्यात येणार

गडचिरोली : छत्तीसगड सीमेलगत असलेल्या गडचिरोली जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील ग्यारापत्ती – कोटगुल जंगल परिसरात शनिवारी सी – ६० पथकाने केलेल्या कारवाईत २६ नक्षली ठार झाले होते. यात देशातील सर्वात मोठा नक्षल कमांडर मिलींद तेलतुंबडे याच्यासह १४ जहाल नक्षल्यांचा समावेश आहे. या नक्षल कारवाईमुळे छत्तीसगड, मध्यप्रदेश, महाराष्ट्र या तीन राज्यांना मोठा फायदा होणार असल्याची माहिती पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील यांनी रविवारी येथील पोलीस मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. या कारवाईमुळे पोलिसांचे मनोबल उंचावले आहे. छत्तीसगड, मध्यप्रदेश व महाराष्ट्रासह देशातील नक्षल चळवळीला मोठा हादरा बसला असल्याची माहिती गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी पत्रपरिषदेत दिली. नक्षल्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले असून त्यावर शवविच्छेदन करून व कायदेशीर प्रकिया पूर्ण झाल्यानंतर जे कुटुंबीय मृतदेह स्वीकारणार असतील त्यांच्या हवाली करण्यात येणार असल्याचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी यावेळी सांगितले. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक (प्रशासन) समीर शेख, अहेरीचे अप्पर पोलीस अधीक्षक अनुज तारे, अप्पर पोलीस अधीक्षक (अभियान) सोमय मुंडे उपस्थित होते.