मातोश्री ग्रामसमृद्धी शेत पांदन रस्ते योजनेचा शासन निर्णय निर्गमित – आमदार कृष्णा गजबे यांच्या प्रयत्नांना यश

118

गडचिरोली : जिल्ह्यातील शेतक-यांच्या बारमाही रस्त्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांनी केलेल्या पाठपुराव्यास यश आले असुन नुकतेच शासन स्तरावरुन मातोश्री ग्रामसमृध्दी शेत पांदन रस्ते योजनेचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आल्याने आमदार गजबे यांच्या प्रयत्नांना यश आल्याचे बोलल्या जाऊ लागले आहे. आरमोरी मतदार संघासह संपूर्ण गडचिरोली जिल्हा आदिवासी, दुर्गम व नक्षलग्रस्त असल्याने जिल्ह्यात कोणतेही मोठे व्यवसाय, उद्योग नाहीत. जिल्ह्यातील नागरिक केवळ शेती व्यवसायावर अवलंबून आहेत.परंतु शेतीची मशागत शेतात खते, बी-बियाणे पोहचवणे, शेतात उत्पन्न शेतमाल घरी किंवा बाजारपेठेत विक्रीला नेताना शेत पांदन रस्त्यांची सोय नसल्याने शेतकऱ्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. शेतक-यांची मुख्य अडचण लक्षात घेता मागील शासनाच्या काळात पालकमंत्री पांदन रस्ते बांधकाम योजना सुरू करण्यात आली होती. परंतु योजना राबविण्यासाठी पुरेसा अवधी न मिळाल्याने शेतकरी पांदन रस्ते बांधकामांपासुन वंचित राहीले. ही बाब आमदार कृष्णा गजबे यांच्या निदर्शनास येताच शेतकऱ्यांसाठी जिवन-मरणाचा प्रश्न असलेल्या पांदन रस्ते योजनेकडे विशेष लक्ष देत मागील शासनाच्या योजनेतील उणीवा विद्यमान शासनाच्या लक्षात आणून देऊन नव्याने पांदन रस्ते योजना सुरू करण्यासाठी पाठपुरावा सुरु केला होता. याकरिता रोजगार हमी विभागाचे अप्पर मुख्य सचिव यांची भेट घेऊन त्यांना योजनेचे गांभीर्य व योजना करताना केवळ माती व मुरुम कामा व्यतीरीक्त पांदन रस्ते दिर्घकाळ टिकण्यासाठी त्यांचे खडीकरण करणे आवश्यक असल्याचे पटवून देत त्यानुसार निधी उपलब्ध करून देण्याची बाब निदर्शनास आणून दिली होती. सदर बाब सचिव महोदयांना पटल्याने त्यांनी जुन्या योजनेत आवश्यक बदल करून शासनाच्या मंजुरी करीता सादर केला असता आमदार कृष्णा गजबे यांच्या पाठपुराव्याला अखेर यश येवून दि. ११/११/२०२१ रोजी मातोश्री ग्रामसमृद्धी शेत पांदन रस्ते योजना नावाने शासन निर्णय निर्गमित करण्यात आला.योजनेतील निकषानुसार ग्रामपंचायतीनीं आपल्या कार्यक्षेत्रातील पांदन रस्ते ग्रामसभेत ठराव मंजूर करुन बांधकामांचे प्रस्ताव पंचायत समितीकडे ३१ मे पर्यंत सादर करावेत, जेणेकरून प्रशासनाला पुढील कारवाई करणे सोईचे होईल, असे आवाहन आमदार कृष्णा गजबे यांनी केले आहे. शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची शेत पांदन रस्ते योजना मंजूर करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करून मंजूर करवुन घेतल्याबद्दल आरमोरी विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांनी आमदार गजबे यांचे आभार मानले आहे.