ग्रामीण भागातील गावठाणचे प्रॉपर्टी कार्ड बनवा – आमदार डॉ. देवराव होळी

131

– हळदवाही ग्रामपंचायत अंतर्गत ९ गावातील जनतेशी आमदार डॉ. देवराव होळी यांनी साधला संवाद

गडचिरोली : ग्रामीण भागातील गावठाणांचे सर्वेक्षण करून ग्रामस्थांना प्रॉपर्टी कार्डचे वितरण करण्यात यावे व नियम ८५ नुसार खातेफोड करून सर्वसामान्य शेतकऱ्यांना होणाऱ्या त्रासापासून मुक्त करावे, असे आवाहन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवराव होळी यांनी ग्रामपंचायत हळदवाई येथील आयोजित जनसंवाद कार्यक्रमाला मार्गदर्शन करताना केले. यावेळी भाजपा बंगाली आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेश शहा, तालुका महामंत्री साईनाथ बुरांडे, युवा मोर्चा अध्यक्ष प्रतिक राठी, सरपंच श्रीमती पुडो, उपसरपंच दुर्गे, माजी सरपंच हिचामी, ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार डॉक्टर देवराव होळी यांनी हळदवाही ग्रामपंचायती अंतर्गत हळदवाही, हळदवाही टोला, माडे मुधोली, नवनितग्राम, कोटरी, गिरीपेठ, मच्छ्ली घोट ,शांतीनगर, जवाहरनगर या ९ गावातील जनतेशी संवादाचा कार्यक्रम आयोजित केला. कार्यक्रमाला या परिसरातील तलाठी, ग्रामसेवक, कृषी सेवक, विद्युत सेवक यांच्यासह संबधित अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना बोलावून कार्यक्रमस्थळी जनतेच्या संवादाच्या माध्यमातून त्यांच्या तक्रारी ऐकून अधिकाऱ्यांना तक्रारींबाबत विचारणा करून तक्रारींचे कार्यक्रमस्थळीच निराकरण केले. काही तक्रारींचे कार्यक्रम स्थळीच निराकरण झाले तर काही तक्रारींचे लवकरच निराकरण करण्याचे आश्वासन उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांनी जनसंवाद कार्यक्रमातील उपस्थित लोकांना दिले. आमदार डॉक्टर देवराव होळी यांनी यावेळी उपस्थितांना गावठाणचे सर्वेक्षण करून जनतेला प्रॉपर्टी कार्ड बनवून देण्यासाठी अधिकारी व कर्मचारी यांनी पुढाकार घ्यावा. तसेच नियम ८५ नुसार खातेफोड करून शेतकऱ्यांना होणाऱ्या त्रासापासून मुक्त करावे, असेही आवाहन उपस्थित अधिकाऱ्यांना केले.