शासकीय धान खरेदी केंद्र सुरू करण्यासह तत्काळ बोनस जाहीर करावे अन्यथा तीव्र आंदोलन करणार – आ. कृष्णा गजबे यांचा ईशारा

121

गडचिरोली : शासनाने ३१ ऑक्टोबरपासुन आदिवासी विकास महामंडळ व प्रादेशिक व्यवस्थापक मंडळा अंतर्गत स्थानिक खरेदी विक्री सोसायटयामार्फत धान खरेदी केन्द्र सुरु करण्यात येणार असल्याचे सूतोवाच केले होते. मात्र संबंधित धान खरेदी केन्द्र अद्यापही सुरु करण्यात न आल्याने शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे जाहीर केल्याप्रमाणे शासकीय धान खरेदी केन्द्र सुरु करण्यासह धानाला तत्काळ एक हजार रुपये प्रती क्विंटल बोनस जाहीर करण्यात यावे, अन्यथा विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आ. कृष्णा गजबे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून दिला आहे. वातावरणाच्या बदलामुळे व गाद या तणामुळे आधीच उत्पादनात प्रचंड घट येत असल्याचे धक्कादायक वास्तव असताना यावर्षी बोनस देण्यात येणार नसल्याचे सांगितले जात आहे. शेतकऱ्यांचे कैवारी असल्याचा ढोल पिटुन सत्तेत आलेल्या महाविकास आघाडीने देण्याची वेळ आली तेव्हा शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार चालवला आहे. हा प्रकार खपवून घेतला जाणार नसुन मागणी मान्य न झाल्यास तिव्र आंदोलन करण्याचा ईशारा आ. गजबे यांनी दिला आहे.