– अहेरी परिसरातील शेतकऱ्यांची प्रचंड गर्दी
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली, ३० जुलै : देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री मा. नरेंद्रजी मोदी यांनी २७ जुलैला देशभरातील एक लाख पंचवीस हजार ‘प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्रांचे लोकार्पण केले व त्यांनी शेतकऱ्यांशी ऑनलाइन सुसंवाद साधला. यावेळी मोदीजी राजस्थानातील सीकर येथे आयोजित कार्यक्रमात उपस्थित राहून विविध कार्यक्रमांचे उद्घाटन केले. यावेळी शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारी बी-बियाणे, औषधे, औजारे, खते हे एकाच ठिकाणी मिळावे या उद्देशाने प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्र ह्या योजनेचा प्रारंभ आणि पीएम किसान सन्मान निधी 14 वा हप्ता वितरित करण्यात आले. या कार्यक्रमाचे भारतीय जनता पार्टी अहेरीच्या वतीने स्थानिक विठ्ठल रुक्मिणी मंदिरात लाईव्ह प्रेक्षपण करण्यात आले.
या कार्यक्रमात माजी पालकमंत्री मा. राजे अम्ब्रिशराव आत्राम हे पूर्णवेळ उपस्थित राहून शेतकऱ्यांशी आस्थेने संवाद साधला. यावेळी अहेरी परिसरातील शेतकऱ्यांनी तुफान गर्दी केली होती. या कार्यक्रमाला तालुका कृषी अधिकारी संदेश खरात, कृषी केंद्र संघटनाचे अध्यक्ष राकेश गुप्ता प्रामुख्याने उपस्थित होते. राजस्थानातून तसेच देशभरातून प्रत्यक्ष आणि आभासी उपस्थितीच्या माध्यमातून सुमारे 2 कोटी शेतकरी यावेळी उपस्थित राहून या कार्यक्रमाला खऱ्याअर्थाने अत्यंत महत्त्वाच्या संमेलनाचे स्वरूप देण्यात आले. देशभरातील 732 कृषी विज्ञान केंद्रे (केव्हीकेएस), 75 आयसीएआर संस्था, 75 राज्य कृषी विद्यापीठे, 600 पंतप्रधान किसान समृद्धी केंद्रे, 5000 प्राथमिक कृषी सहकारी संस्था आणि 4 लाख सामान्य सेवा केंद्रांचे प्रतिनिधी या कार्यक्रमाला उपस्थित होते. या कार्यक्रमाला भाजपा तालुका अध्यक्ष रवी नेलकुद्री यांच्यासह भाजपा पदाधिकारी तसेच अहेरी तालुक्यातील शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पीएम किसान योजना शेतकऱ्यांसाठी लाभदायक : राजे अम्ब्रिशराव आत्राम
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) ही जगातील सर्वात मोठ्या थेट लाभ हस्तांतरण योजनांपैकी एक आहे. सरकारची ही प्रमुख योजना, सर्वसमावेशक आणि उत्पादक कृषी क्षेत्रासाठी धोरणात्मक कृती सुरू करण्याच्या केंद्र सरकारची वचनबद्धता व्यक्त करणारी आहे. ही योजना शेतकऱ्यांसाठी मोठी लाभदायक असल्याचे प्रतिपादन माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी यावेळी केले.
गंधक लेपित युरिया नाविन्यपूर्ण खत : संदेश खरात
सल्फर म्हणजे गंधक लेपित युरिया जे युरिया गोल्ड म्हणून ओळखले जाते ते जमिनीतील सल्फरची कमतरता दूर करेल. हे नाविन्यपूर्ण खत कडुलिंबाचे आवरण असलेल्या युरियापेक्षा अधिक किफायतशीर आणि कार्यक्षम आहे. यामुळे नायट्रोजनचा वापर कमी होईल आणि यामुळे पिकाची गुणवत्ता वाढेल, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी संदेश खरात यांनी यावेळी दिली.