– नावाड्यासह एक महिला वाचली
– दोन महिलांचे मृतदेह सापडले, चार बेपत्ता
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील गणपूर (रै.) येथील वैनगंगा नदीच्या घाटावरून प्रवासी घेऊन निघालेली नाव पाण्यात बुडाल्याने 6 महिला वाहून गेल्याची घटना 23 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास घडली. या घटनेत नावाड्यासह एक महिला वाचली असून दोन महिलांचे मृतदेह सापडले असून चार महिला अद्यापही बेपत्ता आहेत. या घटनेमुळे गणपूर गावात शोककळा पसरली आहे.
प्राप्त माहितीनुसार, रेवता हरीशचंद्र झाडे, मायाबाई अशोक राऊत, सुषमा सचिन राऊत, बुधाबाई देवाजी राऊत, सारुबाई सुरेश कस्तूरे, जिजाबाई राऊत या महिला मिरची तोडण्याकरिता चामोर्शी तालुक्यातील गणपूर (रै.) येथील वैनगंगा नदीच्या घाटावरून चंद्रपूर जिल्ह्यात नावेच्या सहाय्याने जात होत्या. दरम्यान अचानक नदीच्या पाण्यात नाव बुडाल्यामुळे सात महिला व नावाडी पाण्यात बुडाले. यात नावाडी पोहून बाहेर निघाला तर सारुबाई सुरेश कस्तूरे या एका महिलेला वाचविण्यात आले. मात्र सहा महिला वाहून गेल्या. त्यापैकी दोन महिलांचे मृतदेह सापडले असून जिजाबाई दादाजी राऊत असे सापडलेल्या एका महिलेचे नाव आहे तर दुसर्या मृत महिलेचे नाव अद्याप कळू शकले नाही. 4 महिला बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे. या घटनेत गणपूर (रै.) येथील पोलिस पाटलाची पत्नी सुध्दा वाहून गेल्याची माहिती आहे. चामोर्शी पोलिस घटनास्थळी पोहचले असून शोधमोहीम वेगात सुरू आहे.







