Home गडचिरोली ‘त्या’ अनधिकृत डांबर प्लांट प्रकरणी कंपनीवर कारवाई

‘त्या’ अनधिकृत डांबर प्लांट प्रकरणी कंपनीवर कारवाई

124

– संतोष ताटीकोंडावार यांच्या तक्रारीची प्रशासनाद्वारे दखल

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : सिरोंचा-असरअल्ली रस्ता डांबरीकरणाचे काम करण्यासाठी नागपूर येथील मेसर्स प्रशांत कंट्रक्शन कंपनीद्वारे सिरोंचा येथील शासकीय जागेवर अनधिकृतपणे डांबर प्लांटची उभारणी करुन शेकडो ब्रास गिट्टीची साठवणूक केल्याचे उघडकीस आले होते. यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल प्रशासनाने घेतली असून सिरोंचाचे तहसिलदारांनी गुरुवारी सदर कंपनीवर पावणे दहा लाखाची दंडात्मक कारवाई करीत साहित्य जप्तीचे आदेश काढले आहेत. या कारवाईमुळे ताटीकोंडावार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले आहे.

रस्त्याचे काम करताना डांबर प्लांट कामाच्या जवळपास अंतरावर असणे आवश्यक आहे. मात्र संबंधित कंपनीने सिरोंचा माल येथील 413 व 414 या जमिनीवर पडीत व निकामी अवस्थेत असलेल्या बीआरओ कंपनीच्या बॅच मिक्स प्लांटच्या शेतशेजारी अनधिकृत डॉंबर प्लांट उभारले. सार्वजनीक बांधकाम विभाग सिरोंचा यांच्या संगनमताने यात मोठ्या भ्रष्टाचाराला वाव असल्याचा आरोप करीत ताटीकोंडावार यांनी गैरप्रकाराची सखोल चौकशी करुन शासनाची दिशाभूल व फसवणूक करणाऱ्या कंत्राटदारावर कायदेशीर कारवाईची मागणी करीत अहेरीच्या उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या तक्रारीत केला होता. त्यामुळे संबंधित कंपनीतर्फे करण्यात आलेल्या कामासह अनधिकृत जमिनीवर उभारलेल्या डांबर प्लांटची चौकशी करुन कंपनीवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली होती.

या तक्रारीची दखल घेत उपविभागीय अधिकाऱ्यांनी तहसिलदारांना निर्देश दिले होते. याअंतर्गत सिरोंचा मंडळ अधिकारी व तलाठी यांच्याद्वारे सखोल चौकशी करण्यात आली. चौकशीअंती अनधिकृत जागेचा वापरासंबंधी कोणतेही पुरावे नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे सिरोंचा तहसिलदार शिकतोडे यांनी गुरुवारी सन 2021-23 या कालावधीत अनधिकृतरित्या जागेचा वाणिज्यीक वापर केल्याबद्दल एकूण 9 लाख 49 हजार 620 रुपयाचा दंड आकारला आहे. सदर दंडाची रक्कम तत्काळ न भरुन अवैध ताबा सोडावा, अन्यथ साहित्य व साधन जप्तीची कारवाई करण्यात येईल, असेही तहिसलदारांच्या आदेशात म्हटले आहे.

फसवणूक करणाऱ्या कंपनीला काळ्या यादीत टाका
सदर कंपनीच्या कंत्राटदाराने शासकीय जागेवर बेकायदेशीर प्लांट उभारून रस्त्याचे काम केले. सदर कामाचा मोबदला म्हणून संबंधित कंत्राटदाराने आतापर्यंत 29 करोड रुपयांची उचल केलेली आहे. जागेवरील अतिक्रमण अनिधकृत असल्याचे स्पष्ट झाले असतानाच सदर कंत्राटदाराच्या कामाचीही सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. संबंधित ठिकाणावरील यंत्रसामुग्री व इतर साहित्य जप्त करून कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी केली आहे.

error: Content is protected !!