विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात आमदार कृष्णा गजबे यांनी सभागृहात उपस्थित करण्यात आलेल्या शेतकरी प्रश्नांवरील अल्पकालीन चर्चेत सहभागी होऊन आरमोरी मतदारसंघासह गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधले.
ज्यात प्रामुख्याने जून, जुलै २०२३ मध्ये गोसीखुर्द धरणातून अचानक करण्यात आलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे वैनगंगा नदिला मोठा पुर येवून नदीकाठच्या शेतपिकांचे मोठे नुकसान झाले. परंतु त्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही. अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेत नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना जाहीर करण्यात आलेल्या प्रोत्साहनपर अनुदान देण्याच्या योजने अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील उर्वरित पात्र शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान तातडीने देण्यात यावे, अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली माहे ऑगस्ट २०१९-२० मध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिककर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई स्वरूपात त्यांनी उचल केलेल्या कर्जापैकी २ हेक्टर च्या मर्यादेत पिककर्ज माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार प्रशासनाकडून अहवाल सादर होऊन शासनाने त्याकरीता आवश्यक निधी आयुक्त, सहकार विभाग, पुणे यांच्याकडे सुपुर्द करण्यात आला असला तरी शेतकऱ्यांना अजूनही त्याचा लाभ मिळालेला नाही. आरमोरी मतदारसंघातील वडसा, आरमोरी, कुरखेडा तालुक्यात मोहरा व इतर उच्च प्रतीच्या धान पिकाचा निसवा होत असताना पांढऱ्या लोंबामुळे उत्पन्नात मोठी घट होऊन शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली.
अल्पकालीन चर्चेत सहभागी होऊन आमदार कृष्णा गजबे यांनी शेतकरी प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधताना गडचिरोली जिल्ह्यात शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी दिवसा १२ तास विज पुरवठा करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस व उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांचे आभार व्यक्त करुन उपस्थित केलेल्या शेतकरी प्रश्नांना न्याय देण्याची विनंती केली.







