Home गडचिरोली सिरोंचा – आसरअल्ली रस्ता बांधकामाची चौकशी करून फौजदारी गुन्हा दाखल करा

सिरोंचा – आसरअल्ली रस्ता बांधकामाची चौकशी करून फौजदारी गुन्हा दाखल करा

120

– सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांची उपविभागीय अधिकाऱ्यांकडे निवेदनातून मागणी

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्र. 63 सिरोंचा ते आरसअल्लीपर्यंत झालेल्या रस्ता बांधकामात संबंधित अधिकारी व कंत्राटदारांनी संगणमत करुन कामे न करताच करोडो रुपयांची उचल केल्याचे निदर्शनास येत आहे. परिणामी या रस्ता बांधकामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करीत सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी या बांधकामाची सखोल चौकशी करुन संबंधित दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी अहेरीचे उपविभागीय अधिकारी वैभव वाघमारे यांच्याकडे निवेदनातून केली आहे. सदर रस्ता बांधकामाच्या भ्रष्टाचाराची तक्रार सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे सुद्धा करण्यात आली आहे.

यावेळी निवेदनात ताटीकोंडावार यांनी म्हटले आहे की, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 63 वर काम करण्यासाठी प्रशासकीय मान्यता घेण्यात आली. त्यात नमूद असल्याप्रमाणे करारनाम्यात दिसून येत नाही. टेंडर डाक्युमेंट्स नुसार 33 किमी रस्त्याचे काम आहे. मात्र प्रत्यक्षात 22 किमीचाच रस्ता दाखविण्यात येत आहे. उर्वरित 11 किमी रस्त्याचे काम गहाळ करण्यात आल्याचे निदर्शनास येते. सदर महामार्गाचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभाग सिरोंचाच्या हद्दीतील आहे. परंतु करारनामा पत्र सार्वजनिक बांधकाम विभाग 2 गडचिरोली येथे करण्यात आला.

ज्या निकषानुसार काम करणे आवश्यक होते त्यानुसार काम न करता थातूरमातूर काम करण्यात आले आहे. डीबीएममध्ये कामाची थिकनेस दिलेली असताना त्यानुसार काम झालेले नाही. राष्ट्रीय बांधकामासाठी 5 कोटीच्यावर बॅच मिक्स प्लांटने काम करणे अनिवार्य आहे. मात्र सदर कंत्राटदाराने नियमानुसार बॅच मिक्स प्लांट वापरणे आवश्यक असताना शासनाची दिशाभूल करीत ड्रम मिक्स प्लांटमधून डांबर वापरले आहे. सदर काम करणाऱ्या कंपनीने बीआरओचे जुने बॅच प्लांट दाखवून टेंडर पास करवून घेतल्याचे निदर्शनास येत आहे. त्या बीआरओच्या बंद असलेले शासकीय प्लांट व मालमत्ताचे पीडब्ल्यूडी मेकॅनिकलद्वारा प्लांट फिटनेस सर्टिफिकेट देण्यात आले किंवा नाही? रिक्वेस्ट फॉर प्रपोजलच्या कलम 19.1 नुसार कंत्राट प्राईजमध्ये देशातील सर्व टॅक्स एकत्र घेतले असतांना सदर कंत्राटदार, अधिकाऱ्यांनी करारनाम्यात आगाऊ जीएसटीची मागणी केली आहे.

या महामार्गावर दिशादर्शक फलक, क्रॅश गार्ड, साईन बोड, माहिती फलक, बसस्थानक आदीचे कोणतेही बांधकाम करण्यात आलेले नाही. काम न करताच संपूर्ण देयके उचलले असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास येत आहे. सदर कामाचे निरीक्षण करणारी थर्ड पार्टी कन्सटंट, निरीक्षण करणारे साबां विभागाचे वरिष्ठ अधिकारी, साबां विभाग सिरोंचाचे कार्यकारी अभियंता, अधिक्षक अभियंता साबां विभाग गडचिरोली, क्वालिटी कंट्रोलचे काम बघणारे एनक्यूएम/एसक्यूएम अधिकारी या संपूर्ण प्रकरणात लिप्त असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या बांधकामाची सखोल चौकशी करुन संबंधित दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करीत दंडात्मक कारवाई करण्याची मागणी संतोष ताटीकोंडावार यांनी निवेदनातून केली आहे. संबंधितावर कारवाई न झाल्यास उच्च न्यायालय नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्याचा इशाराही संतोष ताटीकोंडावार यांनी दिला आहे.

error: Content is protected !!