– गडचिरोली जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची छगन शेडमाके यांची मागणी
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : मागील वर्षीपेक्षा यंदा जिल्ह्यात कमी पाऊस पडला. धान उत्पादनातही कमालीची घट झाली. त्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत आहे. तरीमात्र दुष्काळग्रस्त यादीतून गडचिरोली जिल्ह्याला वगळण्यात आले. यावर भाजपाचे लोकप्रतिनिधी काहीही बोलायला तयार नाहीत, असा टोला कॉंग्रेस आदिवासी आघाडीचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष छगन शेडमाके यांनी पत्रकातून लगावला आहे.
राज्याच्या १७८ तालुक्यातील ९५९ मंडळांमध्ये दुष्काळग्रस्त परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. यात उद्योगविरहीत व सिंचनाची कुठलीही सोयसुविधा नसलेल्या तसेच ऐन धान कापणीला आला असता मावा व तुडतुडा रोगाच्या प्रादुर्भावाने पिकांचे मोठे नुकसान झाले. असे असताना एकीकडे आदिवासी व शेतकऱ्यांचे कैवारी म्हणवून मिरवायचे आणि दुसरीकडे शेतकऱ्यांनाच वाऱ्यावर सोडायचे, अशा पद्धतीने भाजपाचा दुटप्पी कारभार सुरू असल्याचा आरोप शेडमाके यांनी पत्रकातून केला आहे.
जंगली हत्तींनी धुडगूस घालून शेतातील उभे धान पिक व फळझाडांचे अतोनात नुकसान केले. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात आहे. मात्र लोकप्रतिनिधी यावर काहीही बोलायला तयार नाहीत. त्यांना केवळ मतांचे राजकारण करायचे आहे, अशा शब्दात छगन शेडमाके यांनी टीका केली आहे. गडचिरोली जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करून भरपाई देण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.







