उद्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचा गडचिरोलीत मेळावा ; माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची उपस्थिती

53

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, ११ जुलै : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडल्यानंतर पक्षाचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार व विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार असे दोन गट तयार झाले. पक्षातील दुफळीनंतर माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचा मेळावा प्रथमच गडचिरोली येथील अभिनव लाॅनमध्ये उद्या, १२ जुलै रोजी आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

या मेळाव्याला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गडचिरोली जिल्हा निरीक्षक राजेंद्र वैद्य, माजी नगराध्यक्ष तथा राकॉंपाचे माजी जिल्हाध्यक्ष सुरेश सावकार पोरेड्डीवार, राकॉंपाचे माजी कार्याध्यक्ष अतुल गण्यारपवार, राकॉंचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश ताकसांडे, माजी जिल्हा परिषद सभापती जगन्नाथ पा. बोरकुटे, ज्येष्ठ राकॉं नेते ज्ञानदेव परसुरामकर, एड. संजय ठाकरे, शेमदेव चापले आदी पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

सदर मेळाव्याला गडचिरोली जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक, महिला ज्येष्ठ कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे गडचिरोली शहर अध्यक्ष विजय गोरडवार यांनी केले आहे.