क्रिकेटमुळे शारीरिक व मानसिक विकासाला चालना मिळते : माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांचे प्रतिपादन

121

– गोवर्धन कुनघाडा रै. येथे क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : क्रिकेट हा अतिशय लोकप्रिय मैदानी खेळ आहे. हा खेळ जगातील अनेक देशात खेळला जातो. या खेळाच्या माध्यमातून चपळता, काटकपणा व शिस्तप्रियता इत्यादी गुणांचा विकास होत असून, शारीरिक व मानसिक विकासाला चालना मिळत असते, असे प्रतिपादन आदिवासी प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांनी केले. जय हनुमान क्रिकेट क्लब गोवर्धन कुनघाडा रै. यांच्या वतीने ग्रामीण रबरी बाल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन नुकतेच पार पडले, त्यावेळी ते उद्घाटक म्हणून बोलत होते.
अध्यक्षस्थानी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हनवाडे हे होते. सहउद्घाटक म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे महासचिव डॉ. नामदेव किरसान, जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष अनिल कोठारे हे होते. प्रमुख अतिथी म्हणून अनुसूचित जमाती सेलचे काँग्रेस अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, वाहतूक सेलचे काँग्रेस अध्यक्ष रुपेश टिकले, आदिवासी काँग्रेसचे सचिव दिलीप घोडाम , ग्रा. पं. सदस्य रोशन दुधबळे, विठ्ठल दुधबळे, देवाजी पिपरे, दिवाकर खोबे, पंकज खोबे, रमेश कोठारे, पियुष गव्हारे, साईल वडेट्टीवार, उमेश कुनघाडकर आदी होते.
महाराष्ट्र आदिवासी प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी विकास कामावर बोलताना म्हणाले की, गडचिरोली जिल्ह्यात कुनघाडा रै. हा परिसर बराच मोठा असून, राजकीयदृष्टयाही महत्वपूर्ण आहे. मागील पंधरा ते वीस वर्षांपासून लोकप्रतिनिधिंच्या उदासीन धोरणामुळे परिसराचा विकास झाला नाही. स्थानिक लोकप्रतिनिधीनी दुर्लक्ष केल्यामुळे गेल्या दहा वर्षांपासून तळोधी सिंचन प्रकल्प रखडला आहे. रखडलेले काम येत्या दोन तीन महिन्यात प्रकल्प पूर्ण होणार तसेच कुनघाडा रै. येथे चार कोटी रुपये खर्च करून महसूल मंडळाचे बांधकाम करण्यात आले. मात्र सदर इमारतीची मोठ्या प्रमाणात दुरवस्था होऊन साहित्य चोरीला जात आहेत, नऊ कोटीची प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत गळत आहे. उर्वरित सगळी विकासकामे लवकरच मार्गी लावू, अशी ग्वाही माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांनी दिली.