पोस्टे कोरची व स्थानिक गुन्हे शाखेकडून गुणवत्तापूर्ण तपास करुन अवघ्या 72 तासात आरोपींना अटक
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : बोगाटोला (ता. कोरची जि. गडचिरोली) येथील जंगल परिसरात 31 जानेवारी 2026 रोजी अज्ञात इसमाचा मृतदेह अर्धवट पुरलेल्या स्थितीत मिळून आला होता. सदर गुन्हा अत्यंत गंभीर स्वरुपाचा असून मृतदेहाचा चेहरा कुजलेला असल्याने मयताची ओळख पटवून तपास करणे अत्यंत आव्हानात्मक होते. यावरुन पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली पोस्टे कोरची व स्थानिक गुन्हे शाखा येथील पोलीस पथकाकडून संयुक्तपणे तपासास सुरुवात करण्यात आली होती.
तपासादरम्यान वैद्यकीय अहवालानूसार सदर मयताचा मृत्यू मानेवर धारदार शस्त्राने वार केल्याने झाल्याचे उघड झाल्याने दिनांक 02 फेब्राुवारी 2026 रोजी पोस्टे कोरची येथे अप.क्र. 19/2026 कलम 103 (1), 238 भान्यासं अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने केवळ घटनास्थळावरील दुवे व गोपनिय बातमीदारांच्या मदतीने क्लिष्ट अशा गुन्ह्राची उकल करुन तपासादरम्यान निष्पन्न झाले की, शानु पठाण रा. जांभूळखेडा ता. कुरखेडा, जि. गडचिरोली याचे मयत जितू कवंर, वय 30 वर्षे, रा. जेठकन्हार, ता. डोंगरगड, जि. राजनांदगाव (छ. ग.) याच्या पत्नीसोबत प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधात जितू कवंर हा अडसर ठरत असल्याने कट रचून आरोपी शानु पठाण याने जितू कवंर हा खुर्शिपार ता. कोरची जि. गडचिरोली येथे आलेला असताना आपल्या तीन साथीदारांच्या मदतीने धारदार शस्त्राने मानेवर वार करुन त्याचा खुन केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले.
यावरुन आरोपी 1) शानु पठाण, वय 36 वर्षे, 2) पुंकेश बोरकर, वय 32 वर्षे, 3) चंद्रशेखर गुज्जेवार, वय 27 वर्षे, 4) धनपाल मडावी, वय 21 वर्षे, सर्व रा. जांभुळखेडा, ता. कुरखेडा, जि. गडचिरोली व 5) सोनाली कवंर, वय 25 वर्षे रा. जेठकन्हार, ता. डोंगरगड, जि. राजनांदगाव (छ.ग.) यांना आज दिनांक 04 फेब्राुवारी 2026 रोजी अटक करण्यात आली असून सर्व आरोपींना मा. न्यायालयासमक्ष हजर केले असता, मा. न्यायालयाने आरोपींना एकूण सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. गुन्ह्राचा पुढील तपास पोनि. शैलेंद्र ठाकरे, पोस्टे कोरची हे करीत आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल, प्रभारी अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. कार्तिक मधीरा, उपविभागीय पोलीस अधिकारी कुरखेडा श्री. रविंद्र भोसले यांचे मार्गदर्शनात स्थागुशा गडचिरोलीचे पोनि. अरुण फेगडे, पोस्टे कोरचीचे पोनि. शैलेंद्र ठाकरे, सपोनि. मुकुंद देशमुख, पोउपनि. विकास चव्हाण व पोस्टे कोरची आणि स्थागुशा गडचिरोली येथील पोलीस अंमलदार यांनी पार पाडली.







