Home गडचिरोली नारायणपूर येथे पोलीस व नक्षल चकमक

नारायणपूर येथे पोलीस व नक्षल चकमक

29

– पोलिसांनी केले माओवाद्यांचे दोन तळ उद्ध्वस्त ; मोठा नक्षल साठा जप्त

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : ३ फेब्रुवारीच्या संध्याकाळी कंपनी क्रमांक १० चे उर्वरित माओवादी सदस्य आणि छत्तीसगडमधील अज्ञात माओवादी दलम मधील सदस्यांबाबत मिळालेल्या विश्वसनीय माहितीच्या आधारे उपविभागीय पोलीस अधिकारी भामरागड यांच्या नेतृत्वात त्याच रात्री १४ सी ६० पथकांसह मौजा फोदेवाडा गावाच्या काही किलोमीटर अंतरावर नारायणपूर – गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवर शोध मोहीम सुरू करण्यात आली.

काल दिवसा माओवाद्यांशी काही काळ झालेल्या चकमकीदरम्यान माओवाद्यांचे दोन तळ उद्ध्वस्त करण्यात आले आणि मोठ्या प्रमाणात माओवादी साहित्य जप्त करण्यात आले आहे. मात्र, प्रतिकूल भूभाग आणि घनदाट जंगलामुळे माओवाद्यांचा शोध लागू शकला नाही.

आज सकाळी राबविण्यात आलेल्या अभियानादरम्यान, अतिरिक्त ४ सी ६० पथक आणि सीआरपीएफ क्यूएटीचे १ पथक अभियाना करिता पाठवण्यात आले आहे. आज सकाळपासून माओवाद्यांशी अधूनमधून चकमक सुरू असून, आतापर्यंत एका पुरुष माओवाद्याचा मृतदेह व त्यासोबत १ एके-४७ आणि १ एसएलआर रायफल अशी अग्निशस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. आणखी माओवादी जखमी किंवा ठार झाल्याची शक्यतेची पडताळणी सुरू आहे. मृत पुरुष माओवाद्याची ओळख अद्यापपावेतो पटलेली नाही.

आज संध्याकाळी उशिरा माओवाद्यांनी केलेल्या जोरदार गोळीबारात सी ६० पथकाचा एक जवान एक गोळी लागून जखमी झाला असून त्याला पुढील उपचाराकरिता बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू आहे. सदर जंगल परिसरात शोधमोहीम सुरू असून शोधमोहीम संपल्यानंतर गडचिरोली पोलीस दलाकडून पुढील माहिती देण्यात येईल.

error: Content is protected !!