Home गडचिरोली धान मुद्दाम पावसात भिजवले का? उचल टाळून आता अचानक ‘मुहूर्त’ कसा?

धान मुद्दाम पावसात भिजवले का? उचल टाळून आता अचानक ‘मुहूर्त’ कसा?

42
Oplus_19005440

– पावसाआधी उचल नाही, खरेदीआधी परवानगी कशी? धान घोटाळ्याचा संशय गडद

– चौकशी करण्याची सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांची मागणी

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : मागीलवर्षी खरेदी करण्यात आलेले हजारो क्विंटल धान पावसाआधी वेळेत उचल न करता जाणीवपूर्वक उघड्यावर ठेवण्यात आले आणि संपूर्ण पावसात ते भिजून निकामी झाले. पावसाळा येणार याची पूर्वकल्पना असतानाही संबंधित विभागांनी धान उचलण्याची कोणतीही तातडीची कार्यवाही केली नाही. परिणामी तब्बल ९० टक्क्यांहून अधिक धान खराब झाले. हा निष्काळजीपणा होता की ठरवून केलेली कुचराई, असा थेट प्रश्न आता नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे.

सर्वात गंभीर बाब म्हणजे, पावसाआधी धान उचलण्यास नेमकी अडचण काय होती? त्यावेळी परवानगी मिळाली नाही का? उचल प्रक्रियेसाठी प्रस्ताव पाठवलेच गेले नव्हते का? की मुद्दाम डिओ (DO) काढलेच गेले नाहीत? जर परवानगी मिळत नव्हती, तर त्याची लेखी नोंद कुठे आहे आणि जबाबदार अधिकाऱ्यांनी पाठपुरावा का केला नाही, असे एकामागून एक प्रश्न उभे राहिले आहेत.

यापूर्वी धान उचल प्रक्रिया का सुरू झाली नाही? त्या काळात परवानगी नव्हती असे म्हणायचे असल्यास, आता तीच परवानगी इतक्या सहज कशी मिळाली? मग आधी अडथळे नेमके कोणते होते आणि ते अचानक कसे दूर झाले? की ही संपूर्ण प्रक्रिया आधीपासूनच आ. वि. का. चा नियोजित होती आणि नुकसान झाल्यानंतरच पुढील पावले उचलायची, असा खेळ आखण्यात आला होता का?, असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

धान साठवण, उचल आणि व्यवस्थापन ही केवळ तांत्रिक बाब नसून शेतकऱ्यांच्या श्रमांशी थेट निगडित आ. वि. का. ची जबाबदारी आहे. मात्र येथे ती जबाबदारी पार पाडण्याऐवजी धान पावसात भिजू दिले गेले, नुकसान होऊ दिले गेले आणि आता त्यावर आ. वि. का. पडदा टाकण्यासाठी नव्या खरेदीचा गवगवा सुरू आहे, अशी तीव्र भावना शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.

या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र, सखोल आणि निष्पक्ष चौकशी करून पावसाआधी धान उचल न करणाऱ्या, डिओ न काढणाऱ्या आणि वेळकाढूपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. अन्यथा धान खरेदीच्या नावाखाली सुरू असलेला हा संशयास्पद कारभार आणि ‘पूर्वनियोजित आ. वि. का. चा खेळ’ उघड होणार नाही, असा रोष शेतकरी व्यक्त करत आहेत.

धान उचल न करता पावसात भिजवून तूट दाखवण्याचा पूर्वनियोजित आ. वि. का. चा डाव? मोठ्या राजकीय हस्तकांचा सहभाग असल्याची चर्चा सुरू आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, धान उचल प्रक्रियेत होणारी दिरंगाई ही अपघाती किंवा प्रशासकीय हलगर्जीपणा नसून, आ. वि. का. जाणूनबुजून आखलेला पुनर्नियोजित खेळ असल्याची गंभीर चर्चा सुरू आहे. वेळेत धान उचल न करता ते पावसात भिजू दिले जाते. नंतर त्याची मोठ्या प्रमाणावर तूट दाखवून शासनाकडून भरपाई उचलण्याचा प्रकार केला जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या संपूर्ण प्रक्रियेत केवळ स्थानिक पातळीवरच नव्हे, तर मोठ्या राजकीय नेत्यांचा अप्रत्यक्ष हस्तक्षेप असल्याचे बोलले जात असून, त्यामुळेच संबंधित यंत्रणा मुद्दाम दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिक आणि शेतकरी करत आहेत.

“शेतकऱ्यांचे धान खरेदी करून आ. वि. का.पावसात कुजत असताना प्रशासन गप्प बसले आणि आता खरेदीच्या तोंडावर उचल प्रक्रियेला परवानगी मिळते हा निव्वळ निष्काळजीपणा नाही तर शेतकऱ्यांच्या मेहनतीशी केलेला उघड विश्वासघात आहे. याची सखोल चौकशी झालीच पाहिजे.”

– संतोष ताटीकोंडावार
सामाजिक कार्यकर्ते तथा गडचिरोली जिल्हा अध्यक्ष, जनकल्याण समाजोन्नती अन्याय भ्रष्टाचार निवारण समिती महाराष्ट्र

error: Content is protected !!