– वाहतूक खर्च आणि वेळेची बचत होणार ; डॉ. होळी यांचे २९ तारखेला केंद्र सुरू करण्याचे ठोस आश्वासन
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : कुरंडी माल परिसरात तात्काळ धान खरेदी केंद्र सुरू करण्यात यावे, अशी जोरदार मागणी परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांनी माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्याकडे केली आहे. मागील काही वर्षांपासून हे केंद्र बंद झाल्यामुळे परिसरातील १२ गावांतील शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
कुरंडी माल व परिसरातील एकूण १२ गावांतील शेतकऱ्यांची धान खरेदी मागील ३० ते ३५ वर्षांपासून कुरंडी माल येथे नियमितपणे केली जात होती. मात्र, मागील ४ ते ५ वर्षांपासून हे केंद्र बंद करून ते देलणवाडी येथे सुरू करण्यात आल्याने शेतकऱ्यांवर मोठा अन्याय झाल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. देलणवाडी हे ठिकाण लांब असल्याने शेतकऱ्यांचा वाहतूक खर्च मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. तसेच, वेळ आणि मेहनत यांचा अतिरिक्त भुर्दंड अल्पभूधारक शेतकऱ्यांवर पडत आहे. यामुळे अनेक लहान शेतकऱ्यांना धान विक्रीसाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे.
या अडचणी मांडण्यासाठी ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी एकत्र येत माजी आमदार डॉ. देवराव होळी यांची भेट घेऊन आपल्या व्यथा सांगितल्या. कुरंडी माल येथे पूर्वीप्रमाणे धान खरेदी केंद्र सुरू केल्यास परिसरातील १२ गावांतील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी शेतकऱ्यांच्या मागणीची तातडीने दखल घेत संबंधित विभागाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. इतकेच नव्हे तर, येत्या २९ तारखेला सदर केंद्राचे विधिवत उद्घाटन करून धान खरेदी सुरू करण्याचे ठोस आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
यावेळी वासुदेव मडकाम (अध्यक्ष, धान खरेदी केंद्र, कुरंडी माल), विकास पायदलवार, किशोर ढवळे, यशवंत मडकाम, विनायक मडावी, रोहिदास उईके, सोनल उईके आदींसह शेतकरी उपस्थित होते.







