Home गडचिरोली उपविभाग हेडरी अंतर्गत तुमरकोठी येथे नवीन पोलीस स्टेशनची स्थापना

उपविभाग हेडरी अंतर्गत तुमरकोठी येथे नवीन पोलीस स्टेशनची स्थापना

39

– 24 तासात उभारले नवीन पोलीस स्टेशन

– नागरिकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरिता मैलाचा दगड ठरेल : पोलीस अधीक्षक नीलोत्पल

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : माओवाददृष्ट्या अतिसंवेदनशील गडचिरोली जिल्हा अतिदुर्गम भागात वसलेला आहे. ज्या ठिकाणी बरेच आदिवासी बांधव आज देखील विकासापासून कोसो दूर आहेत, त्यांचा विकास साधावा व माओवाद्यांच्या हिंसक कारवायांना आळा बसावा यासाठी गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने 19 डिसेंबर 2025 रोजी उपविभाग हेडरी अंतर्गत तुमरकोठी या ठिकाणी नवीन पोलीस स्टेशनची स्थापना करण्यात आली.

पोस्टे कोठीपासून 7 किमी व छत्तीसगड सिमेपासुन फक्त 2 किमी अंतरावर असलेल्या अतिदुर्गम भागातील नागरिकांची सुरक्षा व सर्वांगीण विकासाला हातभार लागून ते विकासाच्या मुख्य प्रवाहात येण्याकरिता पोलीस स्टेशन तुमरकोठी मैलाचा दगड ठरेल. सन 2024 वर्षाअखेर 11 डिसेंबर 2024 रोजी पेनगुंडा येथे नवीन पोलीस मदत केंद्र, 30 जानेवारी 2025 रोजी नेलगुंडा येथे नवीन पोलीस स्टेशन, 9 मार्च 2025 रोजी याच भागात कवंडे येथे नवीन पोलीस स्टेशन व 23 नोव्हेंबर 2025 रोजी फुलनार कॅम्प गुंडूरवाही येथे नवीन पोलीस मदत केंद्राची स्थापना करण्यात येऊन अतिदुर्गम भागातील नागरिकांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण करण्यात आली आहे. तसेच गडचिरोली पोलीस दलाच्या नागरी कृती उपक्रमांद्वारे या भागातील नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले जात आहे.

सदर पोलीस स्टेशनची उभारणी करण्यासाठी गडचिरोली पोलीस दलाचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. त्यात एकुण 1050 मनुष्यबळ, 4 जेसीबी, 7 ट्रेलर, 2 पोकलेन, 25 ट्रक इत्यादीच्या सहाय्याने अवघ्या एका दिवसात पोलीस स्टेशनची उभारणी करण्यात आली. सदर पोलीस स्टेशनमध्ये पोलीस बलाच्या सुविधेसाठी वायफाय सुविधा, 12 पोर्टा कॅबिन, जनरेटर शेड, पिण्याच्या पाण्यासाठी आरओ प्लांट, मोबाईल टॉवर, टॉयलेट सुविधा, पोस्ट सुरक्षेसाठी मॅक वॉल, बी. पी. मोर्चा, 8 सँन्ड मोर्चा इत्यादींची उभारणी करण्यात येत असून यासोबतच पोलीस स्टेशनच्या सुरक्षेसाठी गडचिरोली पोलीस दलाचे 2 अधिकारी व 52 अंमलदार, एसआरपीएफ ग्रुप 12, हिंगोली ई कंपनीचे 2 प्लाटुन तसेच सिआरपीएफ 191 बटा. एफ कंपणीचे 1 असिस्टंट कमांडन्ट व 79 अधिकारी/अंमलदार, विशेष अभियान पथकाचे 8 पथक (200 कमांडोज) तैनात करण्यात आले आहेत. तसेच पोलीस स्टेशनच्या उभारणी कार्यक्रमादरम्यान जनजागरण मेळावा आयोजित करुन पोलीस स्टेशन, तुमरकोठी हद्दीतील उपस्थित नागरिकांपैकी महिलांना साड्या, चप्पल, पुरुषांना घमेले, ब्लॅकेट, स्वयंपाक भांड्यांचा संच, मच्छरदानी, युवकांना लोअर पॅन्ट, टि-शर्ट, नोटबुक, पेन, स्कुल बॅग, कंपास, चॉकलेट, बिस्कीट, मुलांना क्रिकेट बॅट, बॉल, क्रिकेट स्टंप संच, व्हॉलीबॉल नेट, व्हॉलीबॉल इत्यादी विविध साहित्यांचे वाटप करण्यात आले. यासोबतच वाढलेल्या सुरक्षेमूळे भविष्य काळात या अतिदुर्गम भागात नवीन रस्ते बांधकाम तसेच एस. टी. बस सेवा सुरू करणे शक्य होणार असून अतिदुर्गम भागात नवीन पोलीस स्टेशनच्या उभारणीमुळे तेथील नागरिकांनी संतोष व्यक्त करुन पोलीस प्रशासनाप्रती आभार व्यक्त केले.

सदर नवीन पोलीस स्टेशन उभारणीच्या कार्यक्रमाप्रसंगी अपर पोलीस महासंचालक (विशेष कृती) डॉ. छेरिंग दोरजे, विशेष पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) संदिप पाटील, पोलीस उपमहानिरीक्षक, गडचिरोली परिक्षेत्र श्री. अंकित गोयल, उपमहानिरिक्षक (अभियान), सीआरपीएफ अजय कुमार शर्मा, पोलीस अधीक्षक गडचिरोली नीलोत्पल, कमांडण्ट 191 बटा. सीआरपीएफ सत्य प्रकाश, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी, उपकमांडंट सीआरपीएफ चंचल परवाना, सहाय्यक पोलीस अधीक्षक धानोरा अनिकेत हिरडे, उपविभागीय पोलीस अधिकारी, भामरागड अमर मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी हेडरी योगेश रांजणकर व पोलीस स्टेशन तुमरकोठीचे नवनियुक्त प्रभारी अधिकारी पोउपनि. गोरखनाथ सुरासे, इतर अधिकारी व पोलीस अंमलदार उपस्थित होते.

error: Content is protected !!