– जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत राज्यपालांना निवेदन सादर
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : बंजारा समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गात समाविष्ट करण्यासाठी राज्य सरकारकडून सुरू असलेल्या हालचाली तत्काळ थांबवाव्यात अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा आक्रमक इशारा अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद गडचिरोली व जंगोरायताड महिला संघटना यांनी दिला आहे. या मागणीसाठी जिल्हाधिकारीbकार्यालयामार्फत राज्यपालांना निवेदन सादर करण्यात आले.
सदर निवेदन आदिवासी विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थित होते. सरकारच्या धोरणांविरोधात संताप व्यक्त करताना परिषदेने स्पष्ट शब्दांत सांगितले की, हा निर्णय म्हणजे मूळ आदिवासी समाजाच्या हक्कांवर घाला घालण्याचा प्रयत्न आहे.
निवेदनात म्हटले आहे की, बंजारा समाजाचा अनुसूचित जमातींच्या ऐतिहासिक, सामाजिक व मानववंशशास्त्रीय निकषांशी कोणताही संबंध नाही. तरीही राजकीय दबावाखाली त्यांना एसटी प्रवर्गात समाविष्ट करण्याचा घाट घालण्यात येत आहे. हा प्रकार म्हणजे संविधानाशी आणि आदिवासी समाजाशी उघड विश्वासघात असल्याचा आरोप परिषदेने केला.
जर हा प्रस्ताव तात्काळ रद्द करण्यात आला नाही, तर आदिवासी समाज रस्त्यावर उतरून राज्यव्यापी आंदोलन छेडेल. याची सर्वस्वी जबाबदारी राज्य सरकारची राहील, असा इशाराही देण्यात आला. शिक्षण, नोकरी व विकास योजनांमधील आदिवासींचे मोजके हक्क हिरावून घेण्याचा हा डाव कदापि सहन केला जाणार नाही, असेही निवेदनात ठामपणे नमूद करण्यात आले. आदिवासी समाजाच्या अस्तित्वाशी खेळणाऱ्या कोणत्याही निर्णयाविरोधात अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद आक्रमक भूमिका घेऊन लढा अधिक तीव्र करणार असल्याचे डॉ. देवराव होळी यांनी यावेळी स्पष्ट केले.
यावेळी निवेदन देताना आदिवासी विकास परिषदेचे विदर्भ सचिव विठ्ठल कोडापे, महिला जिल्हाध्यक्ष पुष्पलता कुमरे, जिल्हा महासचिव उमेश उईके, जिल्हा सचिव सुरज मडावी, महिला जिल्हा सचिव विद्या दुग्गा, युवा नेते पवन गेडाम, जिल्हा उपाध्यक्ष देवराव आलाम, एम्प्लॉईज फेडरेशनचे कोषाध्यक्ष आनंद कंगाले, जिल्हा संघटिका महिला स्मिता नैताम, तालुका अध्यक्ष महिला लिना कोकोडे, शहर अध्यक्ष महिला आरती कोल्हे, मालता पुडो, आरती कंगाले, तनुजा कुमरे, अर्चना टेकाम, शारदा मडावी, वनिता ताराम, मायाबाई उसेंडी आदी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.







