Home गडचिरोली साहेब, आष्टी-सिरोंचामार्गे प्रवास करुन दाखवाच!

साहेब, आष्टी-सिरोंचामार्गे प्रवास करुन दाखवाच!

58

– प्रशासन, शासनाच्या अनास्थेप्रती सर्वसामान्यांमध्ये संतापाची लाट

– 140 किमीच्या मार्गावर लाखो खड्ड्यातून जीवघेणा प्रवास

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : राष्ट्रीय महामार्गावर खाचगळगीची वाट असून रस्त्यावर उडणाऱ्या धुळीचे लोट, भलेमोठे खड्डे, तर पावसाळ्यात या खड्ड्यात साचलेल्या पाण्यामुळे रस्त्यांना आलेले डबक्याचे स्वरुप, यातून वाट काढताना वाहनधारकांची होणारी कसरत, अपघाताचे वाढते सत्र आदींमुळे सर्वसामान्य प्रवाशांची अक्षरश: होणारी कुचंबणा. अशी गंभीर स्थिती आष्टी-सिरोंचा या 140 किमी मार्गाची झाली आहे़.

या रस्त्याकडे प्रशासकीय यंत्रणेने कानाडोळा केल्याने रस्त्याची चाळण झाली आहे़ वर्तमानकाळात या 140 किमी मार्गावर पडलेल्या लाखो खड्ड्यातून सर्वसामान्यांना जीवघेणा प्रवास घडत आहे. परिणामी प्रशासकीय यंत्रणा व शासनाच्या अनास्थेप्रती संतापाची लाट उफाळत आहे. त्यामुळे साहेब या जीवघेण्या मार्गावर प्रवास करुन दाखवाच, असे उघड आव्हान सर्वसामान्यांकडून दिले जात आहे़.

आलापल्ली-सिरोंचा या राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामास राष्ट्रीय प्राधिकरण विभागामार्फत सुरुवात करुन आज चार ते पाच वर्षे लोटत आहे़ मात्र एकीकडे प्रशासकीय यंत्रणेतील अनास्था तर दुसरीकडे शासनाची उदासीनता यामुळे अद्यापही या महामार्ग तडीस गेला नाही़ परिणामी वाहनधारकांसह सर्वसामान्यांना या मार्गावर प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे़ याच महामार्गाअंतर्गत आष्टी-सिरोंचा या 140 किमी मार्गाचे काम हाती घेण्यात आले़ या महामार्गाच्या बांधकामाकरिता १ हजार कोटीची तरतूद करण्यात आल्याची माहिती आहे़ मात्र कामाच्या संथगतीमुळे अद्यापही रस्त्याचे काम पूर्णत्वास आलेले नाही़ उलट या रस्त्याची वाट लागलेली दिसून येत आहे़ या मार्गावरुन अवजड वाहनांच्या होणा-या वर्दळीमुळे मातीमय रस्त्यावर धुळाचे लोट उसळत आहेत, यामुळे आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे़ रस्त्यावरील मोठमोठ्या खड्ड्यामुळे प्रवाशांना मणक्याचे आजार बढावले असून दैनंदिन अपघाताचे सत्र सुरु आहे. सध्या पावसाचे दिवस सुरु असून या मार्गावरील स्थिती तर अधिकच गंभीर बनली आहे़.

चिखलय रस्त्यावर वाहने फसण्याचे प्रकार सातत्याने वाढले असून यामुळे अनेक तास वाहतूक ठप्प पडत आहे़ संबंधित प्रशासकीय यंत्रणेची कामाप्रतीची अनास्था कायम असतांनाच लोकप्रतिनिधीही याकडे गांभीर्याने घेत नसल्याने सवर्सामान्यांमध्ये आक्रोश व्यक्त होत आहे़ तर प्रशासकीय कामकाजावर अंकुश ठेवणारे सत्तेतील पुढारी, मंत्रीही उदासीन धोरण बाळगून असल्याने सर्वसामान्यांना या मार्गावरील जीवघेणा प्रवास आणखी किती वर्षे सोसावा लागणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

मागील 5 वर्षांपासून सुरु असलेला आलापल्ली-सिरोंचा महामार्ग अद्यापही पूर्णत्वास आला नाही, हे शासनाचे अपयश आहे. या महामार्गांवरील मोठमोठ्या खड्यांचा प्रत्येकाला त्रास सहन करावा लागत आहे. खराब रस्त्यामुळे बसेस बंदचे अनेकदा प्रकार घडले असून याचा विद्याऱ्थी, ज्येष्ठ नागरीक तसेच इतर प्रवाशांना मनस्ताप होत आहे़ पावसाळ्यात हा मार्ग संपूर्ण चिखलाने माखलेला असतो़ अनेक वाहने चिखलात फसत असल्याने महामार्ग अनेक तास बंद पडतो. याचा सर्वाधिक फटका आपत्कालीन रुग्ण, गर्भवती महिलांना बसतो़ वेळेवर रुग्णालयात पोहचू शकत नसल्याने मृत्यूही ओढावत आहे़ मात्र याकडे शासन, प्रशासनाने कमालीची डोळेझाक केली आहे़.
– योगेश कोतकोंडावार, गुड्डीगुडम

राष्ट्रीय महामार्गाअंतर्गत येत असलेल्या या रस्त्याची दुरवस्था इतकी भीषण आहे की या मार्गावरुन प्रवास करणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे झाले आहे़ या गंभीर परिस्थितीला जबाबदार कोण? याचा विचार करून शासन, प्रशासनाने तातडीने कारवाई करीत प्रवाशांसह सर्वसामान्य नागरिकांना दिलासा द्यावा़.

– सुनील तोगम, सामाजिक कार्यकर्ता (मरपल्ली)

चार-पाच वर्षापासून बांधकामाची निविदा होऊनसुद्धा निगरगट्ट प्रशासन, शासन 140 किमीचा मार्ग पूर्ण करण्यात असमर्थ ठरली आहे़ या खड्डेमय मार्गावर सर्वसामान्य, गरोदर माता, विद्याऱ्थी, शेतक-यांना मनस्तापास प्रशासकीय यंत्रणेसह शासनही तेवढीच कारणीभूत आहे़ खासदार, आमदार, स्थानिक लोकप्रतिनिधींसह जिल्ह्याचे सहपालकमंऱ्यांनी या मार्गावर वीणा वातानुकूलित वाहनातून प्रवास करुनच दाखवावा. तेव्हाच सर्वसामान्यांची व्यथा त्यांना कळेल.
– संतोष ताटीकोंडावार, सामाजिक कार्यकर्ते

error: Content is protected !!