– आदिवासी बांधवांच्या प्रश्नांना दिले प्राधान्य
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याच्या अतिदुर्गम भागातील भामरागड येथील पोलीस मदत केंद्राला भेट देऊन आदिवासी जनतेच्या मुलभूत समस्या व अन्याय- अत्याचाराचे प्रश्न थेट पोलीस निरीक्षकांकडे मांडण्यात आले. या भेटीदरम्यान आदिवासी समाजावर होणारे अन्याय तत्काळ थांबविणे आणि गावागावातील नागरिकांना पोलीस बांधवांनी समंजसपणे वागणूक द्यावी, अशी ठाम मागणी करण्यात आली.
भाजपा महिला मोर्चा प्रदेश सचिव रेखाताई डोळस यांच्या नेतृत्वाखालील या चर्चेत, ग्रामीण व दुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी बांधवांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय किंवा जबरदस्ती होऊ नये, त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा आणि त्यांच्याशी सन्मानाने वागावे, हे स्पष्ट करण्यात आले. रेखाताईंनी पोलीस निरीक्षकांचे लक्ष वेधून सांगितले की, “माझ्या आदिवासी बांधवांना सर्वतोपरी मदत मिळणे हेच आमचे ध्येय आहे. त्यांच्यावर अन्याय होणार नाही, हे पोलीस प्रशासनाने सुनिश्चित करावे,” असे त्या भेटी दरम्यान केली.
यावेळी राज्याचे मुख्यमंत्री यांनी जाहीर केलेल्या ‘नक्षलवाद संपुष्टात’ या संकल्पाचा उल्लेख करत, काही ठिकाणी पोलीस बांधवांकडून गोरगरीब जनतेला चुकीच्या पद्धतीने ‘नक्षलवादाला पाठीशी घालता’ असा शिक्का मारला जात असल्याची खंतही व्यक्त करण्यात आली. या मानसिकतेत बदल होणे गरजेचे असल्याचेही सांगण्यात आले.
या बैठकीस माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी, किसान मोर्चा प्रदेश सदस्य रमेश भुरसे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सुनीलजी विश्वास, तालुका अध्यक्ष अर्जुनजी आलम, माजी नगराध्यक्ष संगीताताई गाडगे, महिला मोर्चा आदिवासी जिल्हा उपाध्यक्ष सुनीता मडावी, गडचिरोली शहर सचिव पौर्णिमा मडावी आदी उपस्थित होते.
या उपक्रमामुळे स्थानिक आदिवासी समाजामध्ये आत्मविश्वास वाढीस लागला असून, प्रशासन आणि नागरिकांमधील विश्वासाचे नाते अधिक दृढ होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.







