Home गडचिरोली काटली येथील चार मुलांच्या अपघाती मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या ट्रक चालकास अटक

काटली येथील चार मुलांच्या अपघाती मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या ट्रक चालकास अटक

53

– 48 तासांच्या प्रयत्न प्रयत्नाअंती आव्हानात्मक गुन्ह्रातील आरोपींना गडचिरोली पोलिसांनी घेतले ताब्यात

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : आरमोरी – गडचिरोली महामार्गावरील काटली गावाजवळ 7 ऑगस्ट 2025 रोजी पहाटेच्या सुमारास एका अज्ञात ट्रकने फिरायला गेलेल्या सहा मुलांना चिरडल्याची घटना घडली होती. यामध्ये दोन मुलांचा घटनास्थळीच मृत्यु झाला व दोघांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला. तसेच अपघातामध्ये जखमी झालेल्या इतर दोन मुलांना तत्काळ हेलीकॉप्टरच्या मदतीने नागपूर येथे खाजगी रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले होते. सदर चार मुलांच्या अपघाती मृत्यूस कारणीभूत असलेल्या ट्रक चालक व सह चालकास गडचिरोली पोलिसांनी अटक केली आहे.

मौजा काटली (ता. जि. गडचिरोली) येथील काही मुले 7 ऑगस्ट 2025 रोजी पहाटे 4 वाजताच्या सुमारास काटली ते नगरी फाटा रस्त्याने व्यायाम करण्याकरिता गेले होते. यावेळी सुमारे 5 वाजताच्या दरम्यान गडचिरोली ते आरमोरीकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने व्यायाम करणाऱ्या 6 मुलांना चिरडले होते. यामध्ये दोन मुलांचा जागीच मृत्यु झाला होता. तसेच इतर चार मुले जखमी झाले होते. जखमी मुलांना तत्काळ रुग्णवाहीकेच्या मदतीने गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यु झाला होता. तसेच इतर जखमी मुले वय 13 वर्षे आणि 14 वर्षे यांना हेलीकॉप्टरच्या मदतीने तत्काळ नागपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले होते. सदर मुलांवर शस्त्रक्रिया करण्यात आली असून सद्यस्थितीत दोन्ही मुलांची प्रकृती स्थिर आहे.

सदर गुन्ह्राच्या अनुषंगाने पोस्टे गडचिरोली येथे अप. क्र. 0637/2025 सदोष मनुष्यवध (कलम 105 भान्यासं) यासह कलम 281, 125 (ए), 125 (बी) भान्यासं आणि कलम 134, 187, 184 मोटार वाहन अधिनियम अन्वये अज्ञात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आलेला होता.

सदरचा गुन्हा अत्यंत गंभीर स्वरुपाचा असल्याने घटनेचे गांभीर्य लक्षात घेता वरिष्ठ अधिका­यांनी घटनास्थळी भेट दिल्यानंतर पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री. नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली पाच वेगवेगळी तपास पथके तयार करण्यात आली होती. सदर आव्हानात्मक अशा स्वरुपाच्या गुन्ह्राच्या तपासादरम्यान पोलीस पथकांनी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, सिसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या मदतीने गुन्ह्रातील ट्रकचा अत्यंत निपुणतेने शोध घेतला तसेच न्याय वैद्यकीय प्रयोगशाळा, नागपूर येथील पथकाकडून प्राप्त पुराव्यांच्या मदतीने सदर ट्रकचा गुन्ह्रामधील सहभाग निष्पन्न करुन सदर वाहनाला छत्तीसगड राज्यातून ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपी ट्रक चालक प्रविण बाळकृष्ण कोल्हे (वय 26 वर्षे, रा. चिचगड, ता. देवरी, जि. गोंदिया) आणि सहचालक सुनिल श्रीराम मारगाये, (वय 47 वर्षे, रा. चिचगड, ता. देवरी. जि. गोंदिया) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून आरोपींना न्यायालयासमक्ष हजर करण्याची तजवीज करण्यात आली असून पोस्टे गडचिरोलीचे पोनि. विनोद चव्हाण हे गुन्ह्राचा पुढील तपास करीत आहेत.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक, गडचिरोली (प्रशासन) श्री. गोकुल राज जी., उपविभागीय पोलीस अधिकारी, गडचिरोली श्री. सुरज जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोस्टे गडचिरोली येथील प्रभारी अधिकारी पोनि. विनोद चव्हाण आणि पोलीस स्टेशन गडचिरोलीचे अधिकारी व अंमलदार तसेच स्थागुशाचे पोनि. अरुण फेगडे आणि अधिकारी व अंमलदार यांनी पार पाडली.

error: Content is protected !!