– मा. खा. डॉ. अशोकजी नेते यांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली, 21 जुलै : महाराष्ट्र राज्याचे कार्यकुशल, कणखर व लोकभावनेचा आदर करणारे लाडके मुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस यांचा वाढदिवस उद्या, २२ जुलै २०२५ रोजी सेवाभाव दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांच्या वतीने मा. खा. डॉ. अशोकजी नेते यांच्या गडचिरोली येथील जनसंपर्क कार्यालयात विविध सेवाभावी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
दिव्यांग व अंध बांधवांसाठी विशेष मदतीचा हात
कार्यक्रमामध्ये अंध व्यक्तींना स्पेशल सेन्सिटिव्ह स्टिक्स (Voice Sensor Stick) चे वाटप करण्यात येणार आहे. या स्टिकच्या साहाय्याने त्यांना आवाजावरून माहिती मिळवता येते, दिशा समजते आणि त्यांची चालण्याची प्रक्रिया अधिक स्वावलंबी होते. ही स्टिक दिव्यांग बांधवांसाठी एक प्रकारची दृष्टी देणारी साथ ठरत आहे.
मतिमंद विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप
गडचिरोली येथील बोदली मतिमंद विद्यालयातील विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. या साहित्यामुळे त्यांच्या शैक्षणिक प्रवासात प्रोत्साहन मिळेल आणि आत्मविश्वास वाढेल.
अपंग मुलींना कपडे वाटप
सामाजिक जाणीवेतून प्रेरित होत, अपंग मुलींना नवीन कपड्यांचे वाटप करण्यात येणार आहे, जे त्यांच्यासाठी आदर, आनंद आणि आत्मसन्मान निर्माण करणारे ठरेल.
सर्व दिव्यांग व गरजू बांधवांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन सेवाभावाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक मा. खा. तथा भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांनी केले आहे.







