– सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांचा सवाल
‘त्या’ कंत्राटदाराला वाचवणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात आंदोलन उभारणार
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : अहेरी उपविभागात पेरमिली व अहेरी येथे नविन पुरणबांधणीचे काम सदोष असल्याने जनतेला व शाळकरी विद्यार्थांना प्रचंड त्रास होत आहे. पेरमिली येथे 39 कोटी रुपयाचे नविन उपकेंद्राचे बांधकाम सुरू आहे. सध्या सुरू असलेल्या बेसमेंटचे बांधकाम अतिनिकृष्ठ दर्जाचे झालेले असल्यामुळे सदर काम दबत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी केला आहे.
अहेरीमध्ये सुध्दा अंदाजीत 7 ते 9 कोटी रुपयाचे बांधकाम अतिनिकृष्ठ दर्जाचे सुरू असून आतमधील सलाखी योग्यरित्या न लावता व खाली 80 mm च बोल्डर सोलींग न करता काँक्रीट रस्त्याचे काम सुरू आहे. या निकृष्ट कामाची चौकशी करण्याबाबतचे निवेदन आमदार धर्मरावबाबा आत्राम यांना भ्रष्टाचार निवारण समिती गडचिरोलीचे जिल्हाध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी दिले होते.
सदर गंभीर बाबीची तक्रार मुख्यमंत्री तसेच बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सुद्धा करण्यात आली होती. परंतु यावर ‘त्या’ कंत्राटदाराच्या निकृष्ट बांधकामाची कोणतीही दखल घेतली नाही व कंत्राटदाराविरोधात कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे पाणी कुठे मुरते हे समजेनासे झाले आहेत. या भ्रष्ट ठेकेदारांवर कारवाई न केल्यास संबंधित विभागाच्या विरोधात जनआंदोलन उभारण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी दिला आहे.





