Home गडचिरोली कारवाफा आश्रमशाळेत नवागतांच्या पहिल्या पावलांचे उमटले ठसे

कारवाफा आश्रमशाळेत नवागतांच्या पहिल्या पावलांचे उमटले ठसे

131

– बैलबंडीने प्रभातफेरी व पाठ्यपुस्तकांचे वितरण

– प्रवेशोत्सव व पालक मेळावा उत्साहात

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली अंतर्गत कारवाफा येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेत शुक्रवार, २७ जून रोजी प्रवेशोत्सव व पालक मेळावा उत्साहात पार पडला. इयत्ता पहिलीत प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांचे शाळेतील पहिल्या पावलांचे ठसे घेण्यात आले.

सजविलेल्या बैलबंडीमध्ये नवागत विद्यार्थ्यांना बसवून बँड पथकाच्या साह्याने प्रभातफेरीत शैक्षणिक जनजागृती करण्यात आली. पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व वृक्षारोपण करण्यात आले. स्वागताने विद्यार्थी अक्षरशः भारावून गेले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे माध्यमिक मुख्याध्यापक विष्णू चव्हाण होते. उद्घाटक म्हणून प्रकल्प कार्यालयातील नियोजन अधिकारी प्रफुल पोरेड्डीवार होते. प्रमुख अतिथी म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष देवराव नैताम, पोलीस मदत केंद्र कारवाफाचे पीएसआय संतोष कदम, जिल्हा परिषद शाळेच्या केंद्रप्रमुख संध्या मोंढे, सेवानिवृत्त गटशिक्षणाधिकारी शामजी परसे, प्रकाश नरोटे, विठ्ठल सिडाम, शालिकराम मडावी, रूनिता आतला, अनिता उसेंडी आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी शाळेत आनंददायी व उत्साहवर्धक वातावरण निर्माण झाले होते. मान्यवरांनी आपल्या भाषणात शिक्षणाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले व आश्रम शाळेत विद्यार्थी नियमित उपस्थित राहण्यासाठी पालकांना व विद्यार्थ्यांना आवाहन केले.

नव्याने प्रवेशित विद्यार्थ्यांसह सर्व विद्यार्थ्यांचे व पालकांचे गुलाब पुष्पाने स्वागत करण्यात आले. पहिल्या दिवशी इयत्ता पहिलीतील विद्यार्थिनी कीर्ती दुग्गा, निकिता दुग्गा, पवित्रा आतला यांचे शाळेतील पहिले पाऊल कुंकवाच्या ठशांनी उमटवून जतन करण्यात आले. बारावी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थीनी पुजा कोमुलवार, प्रीती नरोटे तसेच दहावी उत्तीर्ण स्वीटी उसेंडी, सुमित कुमरे यांचा सत्कार करण्यात आला. शालेय परिसराची आकर्षक सजावट करण्यात आली होती. यावेळी चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर हास्य दिसत होते.कार्यक्रमानंतर मिष्टान सहभोजनाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक माध्यमिक शिक्षक सुधीर शेंडे यांनी केले. संचालन उच्च माध्यमिक शिक्षिका पद्मावती महेशगौरी तर आभार प्रदर्शन माध्यमिक शिक्षिका वर्षा मस्के यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक सी. डी. नळे, एम. ई. ठाकूर, टी. ए. आस्कर, व्ही. एस. देसू, चंदा कोरचा, रविकांत पिपरे, व्ही. एम. नैताम, कविता बारसागडे, संजय धंदर, अधीक्षिका पुष्पा चव्हाण, सुनिता दुर्कीवार, संगीता करंगामी, शिवाणी शेट्टीवार, कर्मचारी व विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले.

error: Content is protected !!