– ग्राम आरोग्य, पोषण, पाणी पुरवठा व स्वच्छता समित्यांचे सहकार्य घेणार
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : जल जीवन मिशन व स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) 2 अंतर्गत शनिवार, 21 जून रोजीच्या 11 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये ग्राम आरोग्य पोषण पाणी पुरवठा व स्वच्छता समित्या यांच्या सहकार्याने योग सत्रांबरोबरच वृक्षारोपण, स्वच्छता मोहीम व समुदायाच्या पुढाकारातून पर्यावरणीय उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी दिली.
11 वा आंतरराष्ट्रीय योग दिन शनिवार, 21 जून रोजी एक दशक पूर्ण करत आहे. या निमित्ताने देशात विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहे. हे उपक्रम 10 विशेष कार्यक्रमांमध्ये विभागलेले आहेत. या अनुषंगाने योग संगम किंवा मुख्य आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रम 21 जून रोजी सकाळी 6.30 ते 7.45 वाजता आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम मा. पंतप्रधान यांच्या उपस्थितीत विशाखापट्टणम आंध्रप्रदेश येथून राष्ट्रीय कार्यक्रमाशी समांतरपणे होणार असल्याचे गाडे यांनी सांगितले.
योग संगम हे व्यापक जनसहभाग आणि मोठ्या प्रमाणावर योग प्रात्यक्षिकांची परंपरा पुढे नेण्यासाठी आयोजित करण्यात आले आहे. यासाठी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमधील ग्राम आरोग्य पोषण पाणी पुरवठा व स्वच्छता समित्या किंवा परिसरातील आयुष्यमान आरोग्य मंदिर यांच्या सहकार्यानेही आयोजित करण्यात येणार आहेत. यासाठी ग्राम आरोग्य पोषण पाणी पुरवठा व स्वच्छता समित्या यांनी क्यूआर कोड 1 स्कॅन करून योग संगमसाठी मानक कार्यप्रणाली माहिती व इतर संदर्भ सामग्री क्यूआर कोड 2 स्कॅन करून मिळविता येईल, असे गाडे म्हणाले.
हरित योग उपक्रम पारंपरिक योगाभ्यासोबत पर्यावरणीय शाश्ववतेला देखील प्रोत्साहन देण्यात येणार आहे. या वर्षीच्या योग दिन कार्यक्रमाअंतर्गत योग सत्रांसोबतच वृक्षारोपण, स्वच्छता मोहीम व पर्यावरणीय उपक्रम राबविण्यात येणार आहेत, असे सीईओ सुहास गाडे यांनी सांगितले.
या वर्षीच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमात वॉश केंद्रित दृष्टिकोन ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जेणेकरून योग, आरोग्य व वॉश यांच्यातील संबंध अधोरेखित करता येईल. सर्व ग्राम आरोग्य, पोषण, पाणी पुरवठा व स्वच्छता समित्या यांनी ‘योग फॉर वेल बीइंग अँड वॉश’ या संमेलनाचे आयोजन अशा ठिकाणी करावे जिथे जल जीवन मिशन व स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) 2 अंतर्गत मालमत्ता उपलब्ध आहेत. सर्व कार्यक्रम हरित योग किंवा योग संगम या मुख्य कार्यक्रमाशी सुसंगत असावेत, असे सुहास गाडे यांनी म्हटले आहे.
सदर आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमात संबंधित सर्व घटकांनी सक्रिय सहभाग घेऊन व कार्यक्रमाचे आयोजन करून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करण्यात यावे. तसेच सदर कार्यक्रमाची सामाजिक माध्यमांद्वारे प्रसिद्धी देण्यात यावी, असे आवाहन प्रकल्प संचालक रवींद्र कणसे यांनी केले आहे.







