– राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेश अध्यक्ष डॉ. प्रणय खुणे यांची मागणी
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली, 16 जून : चामोर्शी तालुक्यातील रेगडी – घोट या मार्गावर रहदारी मोठ्या प्रमाणात सुरू असून या मार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहे. एटापल्ली, मुलचेरा,भामरागड या तालुक्यातील नागरिक जिल्हा मुख्यालय जाण्याकरिता जवळचा मार्ग म्हणून याच मार्गाचा वापर करत असल्याचे चित्र आहे. सध्या येथील देवदा पुलियाचे काम पूर्ण झाले असल्याने या मार्गावर रहदारी मोठया प्रमाणात वाढली आहे. याच रस्त्यावरून नागरिक छत्तीसगडला सुद्धा जात असतात. परंतु रस्ता अरुंद असल्याने व जागोजागी खड्डे पडल्याने नागरिकांना खूप त्रासाचा सहन करावा लागत आहे. तसेच लॉयड मेटल सूरजागडचे काही मालवाहू वाहने सुद्धा तालुक्याला जाण्यासाठी शॉर्टकट मार्ग म्हणून याच मार्गाने ये – जा करत आहेत. कंपनीच्या डिझेल गाड्या सुद्धा याच मार्गाने जात आहेत. रेगडी – घोट मार्ग अरुंद असल्याने अनेकदा या मार्गावर अपघात होऊन अनेकांनी आपले जीव गमावले आहेत. तरी वरिष्ठांनी याकडे लक्ष देऊन त्वरित या मार्गाची रुंदीकरण करावी, अशी मागणी महाराष्ट्र मानवाधिकार संघटनेचे प्रदेश अध्यक्ष डॉ. प्रणय खुणे यांनी केली आहे.
जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी, जिल्हा उपाध्यक्ष नानु उपाध्ये, युवा नेते शुभंकर चक्रवर्ती, सुमेन विश्वास, प्रशांत शहा व राष्ट्रीय मानवाधिकार संघटना तालुका अध्यक्ष कालिदास बान्सोड, महिला आघाडी तालुका अध्यक्ष विशाखा सिन्हा यांनी संबंधित विषयाला अनुसरून सदर मार्ग बाबत तत्काळ सबंधित विभागाला माहिती दिलेली आहे व सदर मार्गाचे तत्काळ नवीनीकरण करण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या वतीने करण्यात आलेली आहे. तसेच सदर मार्गाचे रुंदीकरण व नवीनीकरण न केल्यास घोट – रेगडी भागातील विविध समस्यांना घेऊन विराट जनआंदोलन छेडण्याचा इशाराही राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या वतीने देण्यात आलेला आहे.







