Home गडचिरोली राज्यातील आश्रमशाळेचे वेळापत्रक बदलणार ?

राज्यातील आश्रमशाळेचे वेळापत्रक बदलणार ?

242

– सिटू संघटनेने केली मागणी ; मुख्यमंत्री व आदिवासी विकास मंत्र्यांनी दिले आश्वासन

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : आदिवासी विकास विभागाच्या राज्यातील शासकीय व अनुदानित आश्रमशाळा शैक्षणिक सत्र २०२३-२४ पासून सध्याच्या शालेय वेळापत्रकाप्रमाणे दोन सत्रात भरत आहेत. सिटू संलग्न आदिवासी विकास आश्रमशाळा शिक्षक व कर्मचारी संघटनेने हे अन्यायकारक व गैरसोयीचे वेळापत्रक बदलवून शाळा पूर्ववत ११ ते ५ या वेळात भरवण्याची मागणी केली असून या मागणीला आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने आश्रमशाळेचे वेळापत्रक बदलण्याची दाट शक्यता आहे. तसे संकेत आदिवासी विकास मंत्र्यांनी दिले आहेत. विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार याबाबत मंत्रालय स्तरावर हालचाली सुरू झाल्या आहेत.

सध्याच्या दोन सत्रातील वेळापत्रकाचे दुष्परिणाम विद्यार्थी व कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावर झाल्याचे दिसून येत आहे. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला मारक असलेल्या या वेळापत्रकाला बदलविण्यासाठी नागपूर येथे नुकत्याच पार पडलेल्या आदिवासी विकास विभागाच्या राज्यस्तरीय क्रीडा संमेलनाप्रसंगी सिटू संघटनेने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांना निवेदन दिले. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सुद्धा आदिवासी विकास मंत्र्यांना वेळापत्रक बदलण्याबाबत योग्य तो निर्णय घेण्याची सूचना दिली होती.

सध्याच्या वेळापत्रकाप्रमाणे सोमवार ते शुक्रवारला पहिले सत्र सकाळी ८.४५ ते दुपारी १२.३० पर्यंत व दुसऱे सत्र दुपारी १.३० ते ४ वाजेपर्यंत तासिका संपल्यानंतरही सायंकाळी ६ वाजेपर्यंत सुरू असते. शनिवारला शाळा सकाळी ७.४५ ते ११.५० पर्यंत असते. दुपारी ३ ते ४.३० पर्यंत प्रेरणादायी उद्बोधन असते.

सिटू संघटनेने वेळापत्रक बदलण्याच्या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी यापूर्वी दोनदा मुंबई येथील आझाद मैदानावर धरणे आंदोलन केले. वेळोवेळी निवेदनेही दिले. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातही संघटनेचे राज्य अध्यक्ष डॉ. डी. एल. कराड, राज्य कार्याध्यक्ष सोमनाथ शेवाळे, राज्य सरचिटणीस प्रा. बी. टी. भामरे, नागपूर विभागीय अध्यक्ष रामदास खवशी,ठाणे विभागीय अध्यक्ष प्रा.प्रमोद पोगेरे, अमरावती विभागीय अध्यक्ष डॉ. अशोक झुंझारे, नाशिक विभागीय अध्यक्ष अमोल वाबळे यांच्या नेतृत्वात वेळापत्रक बदलण्याची मागणी लावून धरली होती.

राज्यस्तरीय क्रीडा संमेलनाप्रसंगी नागपूर येथे निवेदन देताना संघटनेचे राज्य सरचिटणीस प्रा. बी. टी. भामरे, विभागीय अध्यक्ष रामदास खवशी, महिला आघाडी प्रमुख करुणा लांजेवार, राज्य कार्याध्यक्ष सोमनाथ शेवाळे, प्रसिद्धी प्रमुख सुधीर शेंडे, भामरागड प्रकल्प अध्यक्षा सुरेखा तेलतुंबडे, नागपूर प्रकल्प अध्यक्षा वनिता गेडाम यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी, सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!