– सामाजिक आरोग्य धोक्यात ; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : धानोरा तालुक्यातील सावरगाव – चातगाव – धानोरा या मार्गावर रस्ता चौपदरीकरणाचे काम सध्या सुरू आहे. मात्र सदर रस्त्याचे काम निकृष्ट बांधकामामुळे सामाजिक आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे सदर रस्ता बांधकामाची त्वरित चौकशी करावी, अशी मागणी महाराष्ट्र ट्रायबल अँड बॅकवर्ड पिपल्स ॲक्शन कमेटीचे डॉ. प्रमोद साळवे यांनी केली आहे. यासंदर्भात कमेटीच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.
गडचिरोली जिल्हा आदिवासी दुर्गम व नक्षलग्रस्त आहे. या जिल्ह्याला विकासात वाहतुकीची साधने व वाहतुकीचा रस्ता याचे अनन्यसाधारण महत्त्व आहेत. एवढेच नाही तर या जिल्ह्याच्या विकासाच्या वाटा रस्त्यातून जात असल्या तरी यासाठी सामाजिक आरोग्याचा बळी दिल्या जाऊ शकत नाही हे त्रिवार सत्य आहे. विकासासोबत मानवी आरोग्याचे संवर्धन व पर्यावरणाचे रक्षण हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. परंतु सावरगाव – चातगाव – धानोरा येथील रस्ता चौपदरीकरणाचे काम सध्या सुरू आहे. मात्र या कामाकडे लक्ष दिल्यास असे निदर्शनास येते की संबंधित कंत्राटदारास विकास, आरोग्य संवर्धन व पर्यावरण रक्षण याचे काहीही देणेघेणे नाही. केवळ फटाफट काम संपवून मंजूर झालेला निधी गिळंकृत करणे तेवढेच असल्याचे महाराष्ट्र ट्रायबल अँड बॅकवर्ड पिपल्स ॲक्शन कमेटीच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनात म्हटले आहे.

सुरक्षित आणि आरामदायी प्रवास हे ब्रीदवाक्य असताना व सर्वांसाठी आरोग्य हा घटनादत्त अधिकार असताना देखील या रस्त्याच्या बांधकामात जनतेच्या आरोग्याची हेळसांड होत असल्याचे दिसून येत आहे. सदर रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या बांधकामात वाहतूक समस्या निर्माण झाली असून कामाचा दर्जा निकृष्ट असल्याचे दिसून येत असल्याचे कमेटीने निवेदनात म्हटले आहे.
कुठेही रस्त्याचे काम करताना अर्धा रस्ता खोदून बांधल्यानंतर व आवागमनास सुरू केल्यानंतर दुसऱ्या भागाचे काम सुरू करतात. मात्र या ठिकाणी तसे होताना दिसत नसल्याचे कमेटीचे सदस्य डॉ. प्रमोद साळवे, नारायण सयाम, अनिल मेश्राम यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
तसेच सदर रस्त्याचे काम करीत असताना कंत्राटदाराने दुधमाला येथे रेतीचा प्रचंड साठा करून ठेवलेला आहे. हा साठा अवैध रेतीचा उपसा आहे की रॉयल्टीचा आहे याची चौकशी करण्यात यावी, अशीही मागणी महाराष्ट्र ट्रायबल अँड बॅकवर्ड पिपल्स ॲक्शन कमेटीचे डॉ. प्रमोद साळवे, नारायण सयाम, अनिल मेश्राम यांनी जिल्हाधिकारी गडचिरोली यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.






