Home गडचिरोली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आदिवासी विद्यार्थ्यांची तोंड भरून स्तुती

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आदिवासी विद्यार्थ्यांची तोंड भरून स्तुती

199

– राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत पहिल्यांदाच विविध उपक्रमांचे सादरीकरण

– अख्या महाराष्ट्रात प्रगत समाजाचे वेधले लक्ष

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : आदिवासी विकास विभागाचे राज्यस्तरीय क्रीडा संमेलन पोलीस लाईन टाकळी, नागपूर येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर ३ ते ५ जानेवारी या कालावधीत उत्साहात पार पडले. दऱ्या खोऱ्यात, दुर्गम व अतिदुर्गम भागातील आदिवासी खेळाडूंमध्ये उपजत क्रीडा गुण व कौशल्य असल्यामुळे अनेक खेळाडूंनी चमकदार कामगिरी बजावून राज्यस्तरावर आपली छाप पाडली. सोबतच या राज्यस्तरीय क्रीडा संमेलनाचे वैशिष्ट्य म्हणजे पहिल्यांदाच खेळासह नागपूर विभागातील शासकीय आश्रम शाळांमध्ये राबविल्या जात असलेले शैक्षणिक उपक्रम ब्रायटर माईंड, मेमरी इन्हान्समेंट, बोलका वर्ग या उपक्रमाचे उत्कृष्ट सादरीकरण करण्यात आले. यामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचाही समावेश होता. या उपक्रमाद्वारे उपस्थितांना चकित करणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपस्थित मंत्री महोदय व मान्यवरांनी तोंड भरून स्तुती केली.

योग्य शिक्षण व प्रशिक्षण दिल्यास आम्ही कोणत्याही क्षेत्रात कमी नाही हेच आश्रमशाळेत शिकणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांनी दाखवून दिले व प्रगत समाज व्यवस्थेचे आपल्याकडे लक्ष वेधून घेतले. आव्हान स्वीकारणारा आदिवासी विद्यार्थी आश्रमशाळेत घडत असल्याचा अनुभव यावेळी सर्वांनाच आला. या उपक्रमासोबतच भविष्यवेधी शिक्षण तसेच इतर उपक्रमही अपर आयुक्त रविंद्र ठाकरे (भाप्रसे) यांच्या दूरदृष्टी व मार्गदर्शनात नागपूर विभागातील शासकीय आश्रमशाळेत राबविल्या जात आहेत.

मैदानावर आदिवासी खेळाडूंने केलेला थरार, मल्लखांब कौशल्याच्या सादरीकरणावर मिळालेल्या टाळ्यांचा प्रतिसाद तर दुसरीकडे आदिवासी विद्यार्थ्यांचे उज्वल भविष्य व सर्वांगीण विकासासाठी शासकीय आश्रमशाळेतील शिक्षणामध्ये होत असलेल्या दिशादर्शक बदलाची आलेली प्रचिती यामुळे हे राज्यस्तरीय क्रीडा संमेलन आगळे वेगळे ठरले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय रस्ते, परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके, अर्थ, नियोजन, विधी व न्याय राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, सचिव विजय वाघमारे (भाप्रसे), आयुक्त नयना गुंडे (भाप्रसे) यांनी हे उपक्रम राबवित असल्याबाबत अपर आयुक्त रविंद्र ठाकरे (भाप्रसे) यांच्या कार्याची प्रशंशा केली.

ब्रायटर माईंडचे बिनचूक सादरीकरण

नागपूर विभागातील वेगवेगळ्या प्रकल्पातील ब्रायटर माईंडमध्ये कीर्ती हलामी, राशी पोटावी, रवीना मरकाम, मोहित गावळ, आरती मडावी, ऋषिकेश दळांजे, कांचन गायकवाड, रितू मसराम, सुप्रिया परचाके, जीविका नरोटे, होमेश्वरी मरस्कोल्हे, विद्या कुमरे, अंजली इरपाचे, स्वराज उईके, नंदिनी नन्नावरे, चेतना चनाप यांनी डोळ्याला पट्टी बांधून रंग ओळखणे, पुस्तक वाचणे, मोबाईलवरील फोटो ओळखणे, व्यक्ती ओळखणे, डब्यात ठेवलेल्या बॉलच्या आवाजावरून रंग ओळखणे, पझल्स (चित्र जोडणे) यांचे बिनचूक सादरीकरण केले.

स्मरणशक्ती वाढविणारे मेमरी इन्हान्समेंट

मेमरी इन्हान्समेंटमधील फोनिक कोड व डायमंडद्वारे सोहम मडावी, विलास उसेंडी, वैष्णवी हलामी, शालु गावडे, शितल दडमल, नव्या सयाम, ऋतुजा चौधरी, जिजा वेलादी, सारिका मडावी यांनी संविधानातील काही कलमे, पाठ्यपुस्तकातील गोष्टी, सूत्रे, इतर कठीण वाटणाऱ्या बाबी सांगितल्या.

बोलक्या वर्गाचा प्रभाव

बोलका वर्ग उपक्रमात वैष्णवी मडावी, अंकेश पोदाडी, निर्मला हलामी, दिव्या कोराम, ओंकार उईके, सारिका पंधरे, अक्षरा घोडांगे, दिशा सोनवाणे, नंदनी सयाम, संजीवनी कुमरे, संस्कृती मेश्राम, सारिका मडावी, दिपाली सिधनवाड, सीमा एक्का, श्रीलता अरका, सिमरन उरवते हे विद्यार्थी दिलेल्या विषयावर प्रभावीपणे बोलले.
मैदानाची भव्यता, स्वच्छता, उत्तम भोजन व्यवस्था, निवासाची उत्तम सोय, नियोजन व शिस्तबद्धता हे व्याख्यानाजोगे होते. नाशिक, नागपूर, ठाणे व अमरावती या चार विभागातील ३० प्रकल्पातील १ हजार ८७० खेळाडूंनी विविध खेळात सहभाग घेतला होता.

error: Content is protected !!