– अ. भा. आदिवासी विकास परिषद महिला आघाडीच्या वतीने जयपालसिंह मुंडा व सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : आज महिलांनी प्रत्येक क्षेत्रात उंच भरारी घेतली आहे. सावित्रीबाई फुले यांनी जी ज्ञानाची ज्योत स्त्री जीवनामध्ये पेटवली आहे ती दिवसेंदिवस तेजोमय होत आहे. ती ज्योत अशीच तेवत राहावी यासाठी प्रत्येक महिलांनी उच्चशिक्षित व्हावे व सन्मानाने आपल्या कार्याची छाप समाजावर उमटावावी. 19 व्या शतकात सावित्रीबाईंनी जी कुप्रथेविरुद्ध लढा दिला व अनेक हालअपेष्टा सहन करून स्त्रियांच्या जीवनात आनंद आणला. त्या इतिहासाची आज प्रत्येक स्त्रीने उजाळणी करावी आणि सावित्रीबाईच्या कार्यातून प्रेरणा घेऊन स्वतःला बळकट बनवावे. कारण आजही अनेक ठिकाणी कुप्रथा चालूच आहेत त्याचा विरोध करायला पाहिजे आणि महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात आवाज उठवायला पाहिजे, असे प्रतिपादन अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद महिला आघाडीच्या गडचिरोली जिल्हाध्यक्षा वर्षाताई शेडमाके यांनी केले.
अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद महिला आघाडी जिल्हा शाखा गडचिरोलीच्या वतीने आदिवासीचे सर्वोच्च नेते संविधान समितीचे सदस्य जयपालसिंह मुंडा आणि स्त्री शिक्षणाची आराध्य दैवत ज्ञानाई सावित्रीबाई फुले यांची जयंती
आदिवासी जंगल कामगार सहकारी संस्था गडचिरोली येथील स्वर्गीय लहुजी मडावी दलितमित्र यांच्या सभागृहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.
या कार्यक्रमाप्रसंगी उद्घाटक म्हणून राणी दुर्गावती कन्या विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाच्या कोषाध्यक्षा श्रीमती सरोजताई मडावी, कार्याध्यक्ष म्हणून राणी दुर्गावती कन्या विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय गडचिरोलीच्या प्राचार्या श्रीमती वैशाली प्रवीण मडावी, विशेष अतिथी म्हणून श्रीमती मालतीताई सेमले, प्रमुख अतिथी म्हणून अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद जिल्हा महिला आघाडी महासचिव श्रीमती विद्याताई मडावी, लेखिका व कवयित्री श्रीमती प्रतिक्षा कुळमेथे आदींची उपस्थिती होती.
पुढे बोलताना वर्षाताई शेडमाके म्हणाल्या की, आजची स्त्री उद्याच्या उज्ज्वल भविष्याचा पाया आहे. वयाच्या नवव्या वर्षी त्यांचे लग्न 13 वर्षीय ज्योतिराव फुले यांच्याशी झाले. ज्योतिराव हे विचारशील आणि समाजसुधारक प्रवृत्तीचे होते. त्यांनी सावित्रीबाईंच्या शिक्षणाचे महत्व ओळखले. त्यांच्या प्रोत्साहनाने सावित्रीबाईंनी शिकण्याचा निर्धार केला. क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले यांनी सावित्रीबाईला घरीच शिकवलं आणि सावित्रीबाई या शिक्षित झाल्या. महिलांना शिकवण्याचा फुले दांपत्य यांनी निर्धार केला. सावित्रीबाई या प्रतिभावान कवयित्रीही होत्या. त्यांच्या काव्यांतून स्त्रीशिक्षण, सामाजिक परिवर्तन आणि समानतेचा संदेश प्रकट होतो. सावित्रीबाईंच्या शिक्षणाने त्यांच्या जीवनाला नवीन दिशा मिळाली. शिक्षण हा स्त्रियांना समाजातील अन्यायकारक प्रथा आणि अज्ञानाच्या अंधारातून बाहेर काढण्याचा मार्ग आहे, हे त्यांनी ओळखले. त्यांच्या या प्रवासाने स्त्री शिक्षणाच्या क्षेत्रात एक नवा अध्याय सुरू केला आणि भारतात समाजसुधारणेचा पाया घातला. आज भारतातल्या स्त्रिया या शिक्षित होऊन प्रत्येक क्षेत्रात कीर्ती मिळवत आहेत. जिच्यामुळे आपण आज समाजात उंच मान करून जगत आहोत. अशा महान थोर विभूतीस म्हणजेच स्त्री शिक्षणाची आराध्य दैवत सावित्रीबाई फुले यांना माझं कोटी कोटी अभिवादन आहे, असे वर्षाताई शेडमाके म्हणाल्या.
या कार्यक्रमात वर्षाताई शेडमाके यांनी सुंदर अशी कविता सादर केली आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकून उपस्थितांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी राणी दुर्गावती कन्या वस्तीगृहातील विद्यार्थिनी सायली चांदेकर हिने सुंदर असे स्वागत गित सादर केले. तसेच दिक्षा कारेते या मुलीने ‘मी सावित्री बोलते’ हे एकपात्री नाटक सादर केले.
या कार्यक्रमाप्रसंगी कार्याध्यक्षा श्रीमती वैशाली मडावी यांनी प्रास्ताविकेच्या माध्यमातून संघटनेच्या कार्याला उजाडा देत संघटनेचे महत्त्व विषद केले. समाजाला एकत्रित आणण्याकरिता अशा कार्याक्रमाची गरज आहे हे त्यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले. विद्याताई मडावी यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाईंच्या जीवनावर प्रकाश टाकला. मालतीताई सेमले यांनी जयपालसिंह मुंडा यांच्या जीवनकार्याचा आढावा देत आपली स्वरचित कविता सादर केली. श्रीमती प्रतिक्षाताई कुळमेथे यांनी आदिवासी हे निसर्ग पूजक आहेत. आपली संस्कृती ही महान संस्कृती आहे, असे त्यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे संचालन श्रीमती अन्नपूर्णा मेश्राम यांनी तर आभार प्रदर्शन श्रीमती यामिना मडावी यांनी केले. या कार्यक्रमाला अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद महिला आघाडी गडचिरोलीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.







