विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : जिल्ह्यातील आरमोरी मतदारसंघातून भाजपकडून विद्यमान आमदार कृष्णा गजबे यांना तिसऱ्यांदा संधी देत उमेदवारी जाहीर केली आहे. अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या या मतदारसंघात भाजपमध्ये तिकीटासाठी फारशी स्पर्धा नव्हती. कृष्णा गजबे यांनाच संधी मिळणार अशी चर्चा होती, यावर शिक्कामोर्तब झाले.
शांत व मृदू स्वभाव अशी आमदार गजबे यांची ओळख आहे. लोकसभा निवडणुकीत आरमोरी मतदारसंघात भाजप उमेदवार ३० हजारांपेक्षा जास्त मतांनी पिछाडीवर होता. त्यामुळे या मतदारसंघात भाजपपुढे खूप मोठे आव्हान निर्माण झाले. सहकारमहर्षी अरविंद पोरेड्डीवार यांचे या मतदारसंघात वजन असून त्यांच्याच मर्जीतील उमेदवाराला संधी देण्याचा इतिहास आहे.
या मतदारसंघात महाविकास आघाडीकडून इच्छुकांची भाऊगर्दी आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत बंडखोरी होण्याची शक्यता आहे. ती कृष्णा गजबे यांच्या पथ्यावर पडते की लोकसभेचा कौल कायम राहते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. आरमोरी मतदारसंघातील मतदार आता विद्यमान आमदार कृष्णा गजबे यांना हॅटट्रिकची संधी देतात की नाही हे निवडणुकीच्या निकालानंतरच स्पष्ट होणार हे मात्र खरे.







