Home गडचिरोली प्रकल्प अधिकाऱ्यांनी जाणल्या कर्मचाऱ्यांच्या समस्या

प्रकल्प अधिकाऱ्यांनी जाणल्या कर्मचाऱ्यांच्या समस्या

212

– आश्रमशाळा संघटनेकडून निवेदन: विविध मागण्यांचा समावेश

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : सीटू संलग्नित आश्रमशाळा शिक्षक व कर्मचारी संघटनेचे नागपूर विभागीय अध्यक्ष रामदास खवशी यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने सहाय्यक जिल्हाधिकारी तथा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोलीचे प्रकल्प अधिकारी राहुलकुमार मीना यांना बुधवार, ११ सप्टेंबर रोजी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. सर्व समस्या जाणून घेतल्या व त्या सोडवण्याची कार्यवाही करण्याचे आश्वासन प्रकल्पाधिकाऱ्यांनी दिले. यावेळी सहाय्यक प्रकल्प अधिकारी धनराज डबले, अनिल सोमनकर उपस्थित होते.

सादर केलेल्या निवेदनात माध्यमिक व प्राथमिक शिक्षकांची अनुक्रमे ४८०० व ४३०० ग्रेड पे नुसार तसेच लिपिक व वर्ग ४ कर्मचारी यांची सुधारीत एकस्तर वेतन निश्चित करणे, प्रलंबित प्रवास देयके तातडीने अदा करणेस्तव अनुदान उपलब्ध करून देण्यात यावे, शिक्षकांवरील अशैक्षणिक कामाचा बोजा कमी करण्यासाठी रिक्त ठिकाणी लिपिकांची पदे मानधन तत्वावर भरणे व जेथे लिपिकाचे पद भरलेले आहे तेथे शिक्षकांना अशैक्षणिक कामे न देणे,सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती वेतन, ग्रॅज्यएटी, भविष्य निर्वाह निधी, गट विमा, रजा रोखीकरण इत्यादी लाभ तातडीने अदा करण्यात यावे, अत्यंत अपवादात्मक परिस्थितीतच शिक्षकांना दवाखान्यात पाठविण्यात यावे, पुरुष अधीक्षक सुट्टीवर असलेल्या कालावधीत त्यांचा प्रभार महिला अधीक्षिका यांच्याकडे देणे, २०० पेक्षा जास्त विद्यार्थिनी असलेल्या आश्रमशाळेत सहाय्यक अधीक्षिका पद भरणे, रोजंदारी तत्त्वावर कार्यरत वर्ग ४ कर्मचाऱ्यांना साप्ताहिक सुटीची मुभा देण्यात यावी, अनुदानित आश्रम शाळेतील कर्मचाऱ्यांचे वरिष्ठ व निवड श्रेणीचे प्रस्ताव मागविणे, अनुदानित आश्रमशाळातील कर्मचाऱ्यांना डीसीपीएस पावत्यांचा हिशोब देण्यात यावा आदी मागण्यांचा समावेश आहे.

यावेळी शिष्टमंडळात संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष राधेश्याम पत्रे, गडचिरोली प्रकल्प अध्यक्ष देव बन्सोड, विकास जनबंधू, प्रसिद्धी प्रमुख सुधीर शेंडे, डॉ. कमलाकर तिडके, तुकाराम मडावी, अनिल पवार, अशोक परतेकी, गुलाब डोंगरवार, आनंद शंखदरवार, गुलाब हर्षे, जितेंद्र गजभिये, प्रमिला दहागावकर, मीनल शेट्टीवार, बुलबुल वाळके, योगिता बिसेन, कविता बारसागडे आदी कर्मचारी उपस्थित होते.

error: Content is protected !!