देसाईगंजच्या ग्रामीण रुग्णालयात आमदार गजबेंनी घेतली आढावा बैठक

26

विदर्भ क्रांती न्यूज

देसाईगंज : देसाईगंज येथील ग्रामीण रुग्णालय आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांनी अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेऊन ग्रामीण रुग्णालयामार्फत रुग्णांना देण्यात येणाऱ्या विविध सेवांचा आढावा घेतला. तसेच अधिकाऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.

यावेळी आमदार कृष्णा गजबे, भाजपा तालुकाध्यक्ष सुनिल पारधी, तालुका महामंत्री वसंता दोनाडकर, भाजपा तालुका उपाध्यक्ष शंकर पारधी, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश मिसार, सामाजिक कार्यकर्ते रोशन ठाकरे, बाबुभाई कुरेशी, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी, भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, आमदार गजबे यांनी वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करण्यासंदर्भात व आवश्यक आरोग्य सेवा संदर्भात माहिती घेऊन १०० खाटांची व्यवस्था करणे, आवश्यक प्रमाणात डाॅक्टर, कर्मचाऱ्यांची पदभरती, रुग्णांची गरज लक्षात घेता रुग्णवाहिका व ब्लड बँकेची मागणी लवकर पुर्ण होणार असल्याची माहिती दिली. तसेच अत्याधुनिक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासंदर्भातही पाठपुरावा करण्यात आला असून लवकर प्रश्न मार्गी लागणार असल्याने रुग्णांना मोठा दिलासा देण्यात मौलिक मदत होणार असल्याचे सांगितले.