– खा. अशोक नेते यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांची मुंबईत भेट घेऊन दिले निवेदन
– नुकसानग्रस्त शेतीचे तत्काळ सर्व्हेक्षण करण्याचे जिल्हा प्रशासनास दिले निर्देश
गडचिरोली : नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे धानपिक घेणाऱ्या शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. कापून ठेवलेल्या व कापनीसाठी तयार असलेल्या धानाचे पावसामुळे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांचे हातात आलेले पीक गेले. यासह सोयाबीन व कापूस या पिकांचेही मोठे नुकसान झाले. त्यामुळे या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याचे निर्देश प्रशासनास देऊन शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई देण्याची मागणी खासदार अशोक नेते यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांची आज, 16 नोव्हेंबर रोजी मुंबई येथे भेट घेऊन त्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. गडचिरोली, चंद्रपूर व गोंदिया या जिल्ह्यामध्ये मुख्यत्वे करून धानाचे पीक घेतल्या जाते. त्यासोबतच सोयाबीन व कापूस या पिकाची लागवडही मोठ्या प्रमाणावर केल्या जाते. मात्र नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे सर्वच पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला असून आधीच कर्जबाजारी असलेला व गरिबीमध्ये जीवन जगणारा शेतकरी वर्ग संकटात सापडलेला आहे. याची दखल घेऊन सदर नुकसानीचे पंचनामे त्वरित करण्याचे निर्देश प्रशासनास निर्गमित करून शेतकऱ्यांना तत्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी खासदार अशोक नेते यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे केली आहे. तसेच जिल्हा प्रशासनास नुकसानग्रस्त शेतीचे तत्काळ सर्व्हेक्षण करण्याचे निर्देश खासदार अशोक नेते यांनी दिले.